बांगलादेशच्या मोहम्मद युनुस यांचा यादीत शिरकाव!
न्यूयॉर्क : टाइम्स मासिकाने जाहीर केलेल्या २०२५ सालच्या ‘१०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तीं’च्या यादीत यंदा एकाही भारतीयाला स्थान मिळालेले नाही. ही गोष्ट आश्चर्यजनक आहे. मागील काही वर्षांमध्ये अनेक भारतीय व्यक्तींनी या यादीत स्थान पटकावले होते. २०२४ मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपियन साक्षी मलिक यांचा समावेश करण्यात आला होता.
यंदाच्या यादीत बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उद्योगपती एलन मस्क, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांना स्थान देण्यात आले आहे.
भारतातून कोणीच का नाही?
यंदा भारतातील कोणतीही व्यक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रभाव पाडू शकली नाही. रेशमा केवलरमानी यांना ‘लीडर्स’ विभागात स्थान मिळाले असले तरी त्या भारतीय नागरिक नसून अमेरिकन आहेत. त्या ‘वेरटेक्स फार्मास्युटिकल्स’ या बायोटेक कंपनीच्या सीईओ आहेत.
जागतिक नेत्यांचीही अनुपस्थिती
यादीत चीनचे शी जिनपिंग, रशियाचे व्लादिमीर पुतीन, तसेच फ्रान्स आणि जर्मनीसारख्या युरोपीय देशांच्या नेत्यांनाही स्थान देण्यात आलेले नाही. ज्यांनी अलीकडच्या काळात प्रभावी नेतृत्व केले असेल किंवा समाजात परिवर्तन घडवून आणले असेल. अशाच व्यक्तींना टाइम्स मासिक आपल्या यादीत स्थान देते.
युनुस यांना का निवडले ?
मोहम्मद युनुस यांची यादीत निवड ही त्यांच्या नेतृत्वात बांगलादेशात झालेल्या अलीकडच्या राजकीय बदलांमुळे करण्यात आली आहे. त्यांनी ताज्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरवर्षी ‘टाइम्स’ची ही यादी जगभरात चर्चेचा विषय असते. जगभरात विविध क्षेत्रांत भारतीयांचा डंका वाजतोय, मात्र यंदा भारतातून कोणीच न निवडले जाणे हे निश्चितच विचार करण्यासारखे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. काहींनी तर निवड प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली आहे.