दिल्ली : वक्फ कायद्याचा मार्ग मोकळा होणार की येणार अडथळे ?

आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th April, 12:43 pm
दिल्ली : वक्फ कायद्याचा मार्ग मोकळा होणार की येणार अडथळे ?

नवी दिल्ली :  वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ विरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज दुसऱ्या दिवशीही सुनावणी होणार आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या दिवशीच्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. आज सर्वोच्च न्यायालय यावर अंतरिम आदेश जारी करू शकते.

या नव्या कायद्याविरोधात देशभरातून ७२ याचिका दाखल झाल्या आहेत. यामध्ये वक्फ मालमत्तेच्या अधिसूचनेविषयी, गैर-मुस्लिम सदस्यांना वक्फ बोर्डात समाविष्ट करण्याविषयी आणि वक्फ 'बाय युजर'च्या प्रावधानांविषयी आक्षेप नोंदवण्यात आला आहे. वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम सदस्यांचा समावेश का करण्यात आला आहे? तसेच, जुनी वक्फ मालमत्ता जी कोणत्याही कागदपत्रांशिवाय वापरात आहे, तिचे काय होणार?  असा सवाल सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला.  

यावर, नव्या कायद्यात पारदर्शकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गैर-मुस्लिम सदस्यांची संख्या फारशी नसेल, फक्त दोन सदस्यांचीच मुभा असेल, असे केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. या कायद्यातील काही तरतुदी योग्य असल्या तरी अजून काही बाबी स्पष्ट करण्याची गरज आहे. विशेषत: संपत्ती 'डि-नोटिफाय' करण्याच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून स्पष्टीकरण आवश्यक आहे, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय याविषयावर अंतरिम आदेश देऊ शकते. 

हेही वाचा