सासष्टी : दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार!

मूळ झारखंडमधील कामगाराला अटक, फातोर्डा पोलिसांची कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th April, 12:59 pm
सासष्टी : दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार!

मडगाव:  फातोर्डा परिसरात एका परप्रांतीय कामगाराने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिच्या लहान बहीणीची छेड काढून विनयभंग केला. पोलिसांनी मूळ झारखंड युएथील युवकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो व बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडितांपैकी एक मुलगी १० वर्षांची तर दुसरी ८ वर्षांची आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींच्या पालकांची संशयिताशी ओळख होती. मुलींचे आईवडील कामावर असल्याने त्यांनी संशयिताला मुलीला शाळेतून आणण्यास सांगितले होते. त्यावेळी संशयिताने तीन वेगवेगळ्या ठिकाणी पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने सांगितले. 

धक्कादायक बाब म्हणजे, चार दिवसांपूर्वीही संशयिताने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तर लहान मुलीचा तिच्याच घरात येत विनयभंग केला. त्यावेळी पीडितेची मावशी घटनास्थळी आली असता हा प्रकार समोर आला. माहितीनुसार यावेळी पीडित मुलीची आई दुसर्‍याठिकाणी कामाला गेली होती व भीतीपोटी तिने कुणालाही काहीच माहिती दिली नव्हती.

दरम्यान, धमकी देणे, पोक्सो व गोवा बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून संशयिताला अटक करण्यात आली. या प्रकरणी फातोर्डा पोलिस निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रियांका नाईक पुढील तपास करत आहेत. दरम्यान, ‘बायलांचो एकवोट’ संस्थेच्या अध्यक्षा आवढा व्हिएगस यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. कामानिमित्त गोव्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांसोबत त्यांच्या कुटुंबातील मुलांचे सुरक्षित वातावरणही सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे व्हिएगस यांनी म्हटले आहे.




हेही वाचा