रेल्वे अडवली : पुण्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
🚨 नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने पुण्यातील खडकी रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे लोकल अडवून तीव्र आंदोलन छेडले. दुसरीकडे, भाजप युवा मोर्चाही आक्रमक होत काँग्रेस भवनच्या दिशेने कूच करत असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
बालगंधर्व चौकात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेस भवनाबाहेर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 'राहुल गांधी-सोनिया गांधी यांना अटक करा' अशी मागणी करत निदर्शने केली. दरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून काही जण काठ्यांसह निदर्शनात सहभागी झाल्याचे दिसून आले.
काँग्रेसवर २ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले असून भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. "काँग्रेसने चुकीची माहिती देणे बंद करावे", असे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे.
युवक काँग्रेसने लोणावळा-पुणे लोकल अडवून नोटीसचा निषेध केला
बालगंधर्व चौक आणि काँग्रेस भवन परिसरात कडेकोट सुरक्षा
काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली
काँग्रेस विरोधात थेट काँग्रेसभवन समोर भाजपकडून आंदोलन करण्यात येत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते इथे सुद्धा एकवटले आहे. काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते बसून आहेत. तसेच, काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्ते जमायला सुरुवात झाल्याने पोलिसांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांनी भाजपच्या काही समर्थकांना ताब्यात घेतले आहे.