उत्पादन सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी घटले
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विचित्र हवामानाचा काजूनंतर आता आंबा उत्पादनावरही दुुष्परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पाऊस आणि वाढते तापमान यामुळे आंब्याचे उत्पादन सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी घटले आहे. आवक नसल्याने बाजारात आंब्याचे दर अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.
राज्यात ५००० हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड होते. सरासरी हेक्टरामागे २ टन आंब्याचे उत्पादन मिळते. त्यामुळे गोव्यात दरवर्षी सरासरी १० हजार टन आंबा उत्पादन होते. यंदा मात्र ६ हजार टनांहून अधिक उत्पादन मिळणे शक्य होणार नाही. याबाबत कृषी संंचालक संंदीप फळदेसाई म्हणाले, मागील वर्षी आंब्याचे उत्पादन कमी झाले होते. यंदा त्याहूनही कमी होण्याची शक्यता आहे. यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यानंतर तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे आंब्याचा मोहोर करपला. त्यामुळे उत्पादन घटणार आहे.
डोंगुर्ली-ठाणे येथील नेस्टर रेंगल यांची आंब्याची बाग आहे. माणकूर, केसर, आम्रवल्ली यांसह ७० जातीच्या आंब्यांची झाडे त्यांच्या बागेत आहेत. दरवर्षी सरासरी १ लाख आंबे बाजारात पाठवले जातात. यंदा मात्र २५ हजारापर्यंत आंबा पाठवू शकलो. यंदा लहरी हवामानाच फटका आंबा पिकाला बसला आहे, असे नेस्टर रेंगल यांनी स्पष्ट केले.
पणजील आवेर्तान मिरांंडा हे शेतकऱ्यांना आंब्याची लागवड तसेच काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करत असतात. ते म्हणाले, यंदा लहरी हवामानाचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे. यंदा सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून अधिक उत्पादन मिळणे अशक्य झाले आहे.
गोव्यातील स्थानिक आंबे बाजारात दाखल झाल्यानंतर आंब्याचे दर उतरत असतात. यंदा मात्र गोव्यातील पीकच कमी असल्याने दरातही फारशी घसरण झालेली नाही.