देवानंद नाईक यांच्या समितीची मागणी; मुख्यमंत्री, दामू नाईक सकारात्मक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना पुष्पगुच्छ देताना भंडारी समाजाचे नेते.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उपेंद्र गावकर यांनी भंडारी समाजाची स्वतंत्र समिती स्थापन करून भंडारी समाजाचा स्वतंत्र सर्व्हे करण्याची घोषणा केल्यानंतर आक्रमक झालेल्या देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली आणि राज्यातील सर्वच जातींच्या गणनेची मागणी त्यांनी केली. दोन्ही नेत्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देवानंद नाईक यांनी शुक्रवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
भंडारी समाजाचे दयानंद मांद्रेकर, किरण कांदोळकर आदी नेते गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडे भंडारी समाजाचा सर्व्हे करण्याची मागणी करत आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वी झालेल्या भंडारी समाजाच्या निवडणुकीनंतरच्या वादानंतर उपेंद्र गावकर गटाने भंडारी समाजाची नवी समिती स्थापन केली. शिवाय राज्यातील ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या जातींमध्ये भंडारी समाजाच्या नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे राज्यभरातील भंडारी समाजाच्या नागरिकांची गणना करून ओबीसी आरक्षणातील २० टक्के वाटा भंडारी समाजाला मिळावा, यासाठी नवी समिती प्रयत्न करेल, अशी घोषणाही त्यांनी केली होती. उपेंद्र गावकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भंडारी समाजातील दोन गट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असतानाच, देवानंद नाईक यांच्या गटाने गुरुवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली आणि केवळ भंडारी समाजाची नव्हे, तर राज्यातील सर्वच जातींच्या गणनेची मागणी या गटाने केली. समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक आणि इतर सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘भंडारी भवन’ची मागणी पूर्ण करण्याचीही हमी
पिळर्ण कोमुनिदादची पाच हजार चौरस मीटर जमीन भंडारी भवनासाठी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही अनेक वर्षांपूर्वी केली होती. ती मागणी अद्यापही प्रलंबित आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अशीही मागणी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दामू नाईक यांच्याकडे केली असून, तीही मागणी पूर्ण करण्याची हमी दोन्ही नेत्यांनी आम्हाला दिली आहे, असेही देवानंद नाईक यांनी स्पष्ट केले.