पाडी येथे बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

पसार चालकाला कर्नाटकातून अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 01:13 am
पाडी येथे बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

मडगाव : पाडी-बार्शे याठिकाणी बुधवारी रात्री बसच्या धडकेत गंभीर जखमी दिलीप वेळीप (३८) व संदेश गावकर (२७) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित बसचालक राजेश शिवल्ली (रा. शिरवई, केपे) याला अटक केली.                   

कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाडी-बार्शे येथील एका वळणावर हा अपघात घडला. दिलीप वेळीप व संदेश गावकर हे दोघे बुधवारी रात्री ८.३०च्या सुमारास दुचाकीवरून पाडी येथून बाळ्ळीच्या दिशेने कामावर जात होते. याचवेळी राजेश शिवल्ली हा प्रवासी व्होल्वो बस घेऊन बाळ्ळीकडून बार्शेच्या दिशेने जात होता. पाडी येथील वळणावर भरधाव बसचे 

नियंत्रण सुटल्याने गाडीची धडक दुचाकीला बसली. यात दिलीप व संदेश यांना गंभीर जखमा झाल्या. दिलीप याचा जागीच मृत्यू झाला तर संदेश याचा जिल्हा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  कुंकळ्ळी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला व सीसीटीव्ही फुटेजवरून गाडीची ओळख पटवून कर्नाटकातील येल्लापूर येथून घटनास्थळावरून पसार झालेल्या बसचालकाला ताब्यात घेतले व रितसर अटक केली.

अपघातप्रवण मार्ग रुंदीकरणाची मागणी

पाडीतील या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झालेले असून आतापर्यंत सुमारे २० लोकांनी या रस्त्यावर जीव गमावला आहे. महामार्गाचे काम होणार असल्याचे जाहीर केले जाते. पण, तोपर्यंत उपाययोजना करण्याची गरज आहे. राज्य सरकारने अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या वळणावरील रस्ता रुंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रशांत नाईक यांनी केली आहे.