मंत्री गोविंद गावडे यांचे स्पष्टीकरण
पणजी : कला अकादमीमध्ये ‘पुरुष’ नाटकाच्या सादरीकरणादरम्यान प्रकाश यंत्रणा बंद होण्याचा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडला. ही कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांची चूक नाही. शरद पोंक्षे यांनी केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. काही लोकांनी माझ्या बदनामीची सुपारी घेतली आहे, असे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
कला अकादमीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सदस्य सचिव अरविंद खुटकर आणि व्यवस्थापक सुशांत नाईक उपस्थित होते. कला अकादमीत रविवारी ‘पुरुष’ नाटकाचा खेळ दुपारी ३.३७ वा. सुरू होता. यादरम्यान ४.४० वा. थिएटरमधील दिवे चमकत होते. वीज तंत्रज्ञांनी यावेळी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. रंगमंचावरील सेटअप आणि नाटक चालू असल्यामुळे त्यातील त्रुटी दूर करता आल्या नाहीत. पुढे हॅलोजन दिव्यांच्या मदतीने प्रयोग सुरू झाला, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
प्रकाश व्यवस्थेचा दर्जा सुधारणार
पीडब्ल्यूडीतील एका कंत्राटदाराने सदर प्रकाशयोजनेचे काम केले होते. दोष निवारण दुरुस्ती कालावधी असल्याने ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. पीडब्ल्यूडीला प्रकाश यंत्रणेतील दोष दूर करण्यास सांगण्यात आले आहे. कृती दल आणि कलाकारांच्या सूचनांनुसार प्रकाशयोजनेचा दर्जा सुधारण्यात येणार आहे.
शरद पोंक्षे चुकीचे बोलले
शरद पोंक्षे चुकीचे बोलत आहेत ते चुकीच्या लोकांचे अनुसरण करत आहेत, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. जेव्हा दिवे लुकलुकू लागले तेव्हा कला अकादमीचे तंत्रज्ञ तिथे होते. त्यांनी दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. कला अकादमीमध्ये तंत्रज्ञ नसल्याचे पोंक्षे यांचे विधान चुकीचे आहे. कला अकादमीच्या मुद्द्यावर बरेच लोक माझी बदनामी करत आहेत, असेही ते म्हणाले.