सोनसाखळ्या चोरणारे पुन्हा सक्रिय

मेरशी, धुळापी, खोर्लीत तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 01:16 am
सोनसाखळ्या चोरणारे पुन्हा सक्रिय

म्हापसा : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून गुरुवारी (दि. १७) तिसवाडीतील धुळापी, मेरशी व खोर्ली-म्हापसा येथे तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरी प्रकरणी जुने गोवे व म्हापसा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.
गुरुवारी, दि. १७ रोजी या चोरीच्या घटना सकाळी घडल्या. या चोरीच्या घटनांमध्ये समानता असल्यामुळे त्या एकाच दुचाकीस्वार टोळक्याने केल्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केल्या आहेत. सकाळी प्रथम खोर्ली, म्हापसा येथील आपल्या घरासमोर उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिस्कावून नेण्याचा प्रकार घडला. हे मंगळसूत्र खेचून अज्ञात दोघे दुचाकीस्वार भरधाव पसार झाले.
त्यानंतर तिसवाडी तालुक्यातील मेरशी व धुळापी येथे अशाच प्रकारे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी हिसकावली गेली. या घटना घडताच उत्तर गोव्यात पोलिसांनी लागलीच नाकाबंदी केले. उत्तर गोव्यातील पोलिसांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील मोक्याच्या ठिकाणी तसेच सीमेवर ही नाकाबंधी केली. मात्र, हे अज्ञात चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
सं‌शयितांचा तपास सुरू
गळ्यातील सोनसाखळी खेचून नेण्याचा प्रसंग ओढवलेल्या तिन्ही पीडित महिलांची जुने गोवे व म्हापसा पोलिसांनी चौकशी केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांत रितसर गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा ठावठिकाणा लावण्यासाठी तपास सुरू केला आहे.