केंद्राकडून अजून मुदतवाढ नाही; पाच ते दहा टक्के काम शिल्लक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केंद्र सरकारने दिलेली पंधरा दिवसांची मुदतवाढ संपल्यामुळे पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्यामार्फत सुरू झालेली भटक्या आणि पाळीव कुत्र्यांची गणना थांबवण्यात आली आहे. अद्यापही राज्यात अशा कुत्र्यांच्या गणनेचे पाच ते दहा टक्के काम शिल्लक असून, केंद्राने मुदतवाढ देताच गणना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक डॉ. नितीन नाईक यांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
राज्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात काही जणांकडे हिंस्र जातीची कुत्रीही आहेत. हिंस्र जातीच्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांत यापूर्वी काही जणांचे बळी गेले असतानाच, शुक्रवारी फोंडा येथे एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समोर आले. असे प्रकार रोखण्यासाठी आणि भटक्या कुत्र्यांवर उपाय योजण्यासाठी केंद्र सरकारने गोव्यासह सर्वच राज्यांना पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने काही महिन्यांपूर्वी हे काम सुरू केले. सुरुवातीला या गणनेसाठी ३० मार्चपर्यंतची मुदत दिली होती. आता त्यात १५ दिवसांची वाढ करून १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही राज्यात गणनेचे पाच ते दहा टक्के काम शिल्लक आहे. केंद्राने पुन्हा मुदतवाढ न दिल्याने हे काम थांबवल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले.
कुत्र्यांवर नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक संस्थांंची
भटक्या कुत्र्यांवर नियंंत्रण तसेच त्यांचा बंंदोबस्त करण्याची जबाबदारी कायद्याप्रमाणे पंंचायत, पालिका या स्थानिक स्वराज संंस्थांंची आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण तसेच योजनेसाठी निधी देण्याची जबाबदारी पशुसंवर्धन आणि चिकित्सा सेवा खात्याची आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंंत्रण ठेवण्यासाठी गोवा जनावरे व्यवस्थापन योजना आहे. या योजनेखाली निधीची तरतूद आहे. योजना खात्याची असली तरी कार्यवाहीची जबाबदारी स्थानिक स्वराज संंस्थांंची आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी पंंचायत/पालिकांकडून खात्याकडे प्रस्ताव यावा लागतो, असे संंचालक डॉ. नितीन नाईक यांनी स्पष्ट केले.
किनारी भागांत भटक्या कुत्र्यांचा हैदोस
राज्याच्या किनारी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. सकाळच्या सत्रात किनाऱ्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांना भटकी कुत्री टोळ्यांनी लक्ष्य करत आहेत. याबाबत पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याकडे तक्रार करावयाची झाल्यास खात्याने दिलेले संपर्क क्रमांकही बंद लागतात, अशा प्रतिक्रिया कळंगुट, बागा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
पर्यटन विकास महामंडळाच्या किनारी भागात असलेल्या रेसिडन्सीत वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांना भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांत कळंगुट रेसिडन्सीत आलेल्या सुमारे बारा पर्यटकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार घडले आहेत. पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने याची दखल घेऊन अशा कुत्र्यांवर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळात या भागांतील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती कळंगुट रेसिडन्सीच्या एका अधिकाऱ्याने दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.