भावा-बहिणीच्या प्रेमाचे वर्णन करणारी ही ओवी म्हणजे निराशेच्या शुष्क धरतीतून उगवलेला हिरवागार कोंब होय.
घरणीबाईच्या ओव्यांमध्ये नात्यांचे अनेक रंग दिसून येतात. आई, वडील, भाऊ, बहीण यांचे पारंपरिक प्रेम ओव्यांमधून व्यक्त होते तर कधी याच भावंडांमध्ये होणारे हेवेदावे ही दिसून येतात. कधी श्रीमंत भाऊ गरीब बहिणीची थट्टा करतो. तर कधी श्रीमंत बहीण गरीब भावाचा अपमान करते. कधी सासू-सुनेचा जाच दिसून येतो तर कधी जावा-जावांमधील छुपी भांडणे या ओव्यांमधूनच उघडी पडतात. पण कधी कधी भावा-बहिणीचं एकमेकांवर असलेले निस्सिम प्रेम ही याच ओव्यांमधून पाझरू लागते. अशीच एका भावा-बहिणीची कहाणी घरणीबाई ओवीमधून गाऊ लागते.
गरीब बहीण खूप दिवसानंतर आपल्या माहेरी आपल्या श्रीमंत भावाच्या घरी येते. त्यावेळी नेमका भाऊ शेतात असतो. भावजय घरी असते. गरीब नणंद घरी आली हे पाहून भावजईला आनंद तर होतच नाही, उलट तिला वाटते की ही नणंद आपले घर लुटायला आली आहे. भावाचे घरदार धनधान्याने भरलेले असते. तरीही ज्या घरावर बहिणीचा अर्धा हक्क आहे अशा आपल्या हक्काच्या माहेरी या बहिणीच्या ओटीत एक मूठ दाणेही पडत नाहीत. भावजय बहिणीच्या हाती भाताच्या कोंड्याचे रोट (जाड भाकरी) देऊन तिची पाठवणी करते. बहिणीला वाटते, आपल्या भावाच्या घरी कदाचित दुष्काळ पडला असावा म्हणून त्याच्या घरी कुंड्या-मांड्याच्या भाकऱ्या थापल्या जात असाव्यात. माहेराहून परतताना शेताच्या बांधावरून चालत असताना बहीण गाऊ लागते
लाग लाग रे मिरगा
माझ्या बंधवाच्या शेता
माथ्यार कुण्याची गे रोटा
दूर शेतात काम करणारा भाऊ आपल्या बहिणीचा गोड आवाज ओळखतो. त्या गोड आवाजाला असलेल्या दुःखाची किनार सुद्धा तो ओळखतो.
लाग लाग रे मिरगा
माझ्या बंधवाच्या शेता
माथ्यार कुण्याची गे रोटा
बंधू विचार करी
या गाण्याच्या काय परी
गेलो परत तुम्ही घरी
आपली बहीण असे गाणे का बरं गात असावी, याचा विचार तो करू लागतो. यावर्षी मिरगाचा म्हणजे मृगाचा पाऊस तर भरपूर कोसळला. मग बहीण माझ्या शेतावर मिरगाचा पाऊस पडू दे असे का म्हणते? घरही धनधान्याने भरले आहे. तरीसुद्धा आपल्या ‘माथ्यावर कुण्याची रोटा आहेत’ असे का म्हणते? याच ओळींचा विचार करीत भाऊ घरी पोहोचतो. ह्या पूर्ण वाटभर विचार करून आपल्या घरी आपल्या बायकोने बहिणीला कशी वागणूक दिली असावी याचा त्याला अंदाज येतो.
भाऊ वाघासारखा मर्द गडी जरी असला, तरी बायको पुढे ती शक्ती दाखवून उपयोग नाही. बायको समोर युक्तीच वापरली पाहिजे याचा अंदाज त्याला आजवरच्या संसारात आलेला असतो.
गेलो परतुनी घरी
तो काय बोलता अस्तुरी
तुझ्या माहेराच्या गे घरी
लागली नी गे आग
घरी पोहोचताच भाऊ आपल्या बायकोला तिच्या माहेरी आग लागल्याची वार्ता देतो. माहेरी आग लागून घर जळाले हे समजतात भावजय बेचैन होते आणि आपल्या नवऱ्याला म्हणते,
थांब थांब सो धनी
जा तू माझे नि माहेरी
जूप बैल आणि गाडी
ती काय भरली धनधारी
असे म्हणत पूर्ण बैलगाडी धनधान्याने भरते. माहेरचे आगीमुळे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज बांधते. एका नव्याने सुरू होणाऱ्या संसाराला ज्या ज्या गोष्टी लागतात जेवढे धनधान्य लागते ते सगळे ते बैलगाडीमध्ये भरते. जेणेकरून आपल्या माहेरच्यांना कष्ट होऊ नये. त्यांची आबाळ होऊ नये. बैलगाडी गच्च भरून आपल्या नवऱ्याला म्हणते,
स्वामी जुप नी तुझी गाडी
चला माझे नी माहेरी
बंधुन जुपली गे गाडी
बंधू लागलो गे वाटे
वाट माहेरीची सोडली
वाट धरली भयनीची
गेलो भयनीचे घरी
जी सुप्त इच्छा मनी ठेवून भावाने आपल्या बायकोला तिच्या माहेरी आग लागली ही खोटी वार्ता दिली होती. ती त्याची इच्छा पूर्ण झाली. आपल्या बहिणीच्या माथ्यावर कोंड्याचा रोटा देणारी तीच आपली बायको आपल्या माहेरी देण्यासाठी मात्र गाडाभर सामान देते. बायकोचा हा स्वार्थी स्वभाव आणि बहिणीचा गरीब स्वभाव भाऊ बरोबर ओळखून होता. गरीब बहीण कोंड्याचा रोटा बघून भावाला दुष्काळातून दूर कर म्हणत देवाची आळवणी करत वाट चालत होती. तर इकडे आपली बायको एकीकडे बहिणीचा असा अपमान करते तर दुसरीकडे आपले माहेरीचे घर कुठलीही शहानिशा न करता धनधन्याने भरू इच्छिते. अशा या दोन टोकाच्या दोन किनाऱ्यामधून मध्यस्थी कशी साधायची हे भाऊ ओळखतो. भरलेला गाडा घेऊन आपल्या सासरी जाणारा भाऊ मध्येच ती वाट सोडून बहिणीच्या
घरची वाट धरतो. संसार उपयुक्त सामान आणि गच्च भरलेली ती गाडी आपल्या बहिणीच्या अंगणात आणून सोडतो.
आपला भाऊ असा अचानक आपल्या घरी आला ती ही बैलगाडी भरून सामान घेऊन याचे बहिणीला किंचित आश्चर्य वाटते.
भयन दूरसून बगी
माजो बंधू गे येईलो
गाडी सोडिली दारापाशी
भयनी घे घे तुका धनधारी
असा बंधू लाखात एक जो नुसत्या एका गाण्याच्या ओळीवरून आपल्या बहिणीचे दुःख ओळखतो. आपल्या बायकोने बहिणीला कोंड्याची रोटा दिलेली, हे समजतात बहिणीवर अमाप प्रेम करणारा भाऊ कष्टी होतो. आपल्या घरातील सगळ्यात चांगल्यातली चांगली वस्तू आपल्या बहिणीला कशी मिळेल याचा विचार करीत एक भाऊ आपल्या बहिणीच्या प्रेमापोटी अशी शक्कल लढवतो की एका क्षणात निर्धन बहीण सधन होते. बायकोने माहेरी पाठवण्यासाठी धनधन्याने भरलेली गच्च बैलगाडी तिच्या माहेरी न पोहचवता थेट बहिणीच्या घरी पोहोचवतो. भावा बहिणीच्या प्रेमाचे वर्णन करणारी ही ओवी म्हणजे निराशेच्या शुष्क धरतीतून उगवलेला हिरवागार कोंब होय.
घरणीबाई आपल्या जात्याच्या घरोट्यामधून बहीण-भावाच्या गोड प्रेमाच्या पिठाच्या राशी दळत असते. आजूबाजूला पडलेल्या पिठाच्या टेकड्या म्हणजे त्यांच्या नात्यातील उतार-चढ होय. नात्यातील उतार-चढाव घरणीबाई नेमक्या शब्दात मांडताना अशा वृत्तीच्या माणसांना हळूच चिमटाही काढताना दिसून येते. याच्यातूनच मनात रुजू घातलेले दुष्ट विचारांचे कोंब तिथल्या तिथे खुंटून काढण्याचे कसब घरणीबाईच्या ओव्यांमध्ये आहे.
गाैतमी चाेर्लेकर गावस