गोव्याचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात?

अवेळी पडणारा पाऊस, शेतात साचणारे पाणी आणि बंधाऱ्यांना जाणूनबुजून केलेल्या नुकसानीमुळे मीठाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात.

Story: साद निसर्गाची |
13th April, 03:15 am
गोव्याचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात?

सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक व्यावसायिक पद्धतींसाठी प्रसिद्ध असलेले गोवा हे भारतातील सर्वात छोटे राज्य. आधुनिक संस्कृतीकडे तरुणांचा कल, प्रदूषण, वाढते शहरीकरण, हवामान बदल, या न अशा अनेक कारणांमुळे गोव्यातील पारंपरिक व्यवसाय धोक्यात येत आहेत. आपले अस्तित्व हरवत चाललेला गोव्यातील असाच एक विशिष्ट पारंपरिक व्यवसाय म्हणजे मीठशेतीचा व्यवसाय. ही मिठागरे समुद्राच्या किनाऱ्यांवर, विशेषत: खारेपाटी भागांमध्ये असतात. 

पारंपरिकपणे मीठ तयार करण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणजे मिठागरे. १५० दशकांपासून चालणारा हा व्यवसाय गोव्यातील मिठगौड, गौड, भंडारी, आगरी आणि आगर समुदायांचा पारंपरिक व्यवसाय आहे. गोव्यातील पारंपरिक मीठशेतीत मूळ संख्येच्या तुलनेत २५ टक्के घट झाल्याचे संशोधन सांगते. कुशल कामगारांचा अभाव, औद्योगिक पद्धतींद्वारे घेतलेले उत्पन्न, अचानक होणारा हवामान बदल या कारणांमुळे पारंपरिक मीठ उत्पादनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

मांडवी नदीच्या काठावर असलेल्या रायबंदर भागातील काही मिठागरांच्या मालकांशी संपर्क साधला असता त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपूर्वी रायबंदर ते पणजी बसस्थानकापर्यंत एकूण ३० मीठाचे आगर (मिठागर) होते. सध्याच्या घडीला त्यापैकी फक्त दोन आगरात मीठाची लागवड केली जाते. उर्वरित आगर एकतर चिखलाने भरलेले आहेत, पाण्याखाली गेलेले आहेत किंवा पडीक आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 

मीठ शेती तीन टप्प्यात केली जाते. पावसाळ्यानंतरचा म्हणजे जून ते ऑक्टोबरपर्यंतचा पहिला टप्पा, डिसेंबर ते जानेवारीपर्यंतचा दुसरा टप्पा तर फेब्रुवारी ते जूनपर्यंतचा तिसरा टप्पा. पावसाळा संपल्यानंतर मीठ पिकवण्यासाठी मिठागर बनवण्याची तयारी सुरू होते. सुरुवातीला, स्ल्युस गेटच्या (मानस) सहाय्याने हवे तेवढे समुद्राचे पाणी आगरात घेतले जाते. मानस किंवा स्ल्युस गेट ही शेतात समुद्राच्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी एक विशेष नियंत्रण यंत्रणा आहे.

मीठ पिकवण्याची प्रक्रिया सुरु करण्याअगोदर मिठागरांमध्ये साचलेले पाणी बाहेर फेकून आगर स्वच्छ केले जातात. नंतर जवळजवळ एक महिना हे आगर नैसर्गिकरित्या वाळण्यासाठी सोडून दिले जातात. आगर सुकल्यानंतर स्ल्युस गेटच्या सहाय्याने समुद्राचे 

पाणी आगरात घेतात. आगराच्या मोडलेल्या/भेगा पडलेल्या बंधाऱ्यांना दुरुस्त करण्यासाठी हे पाणी वापरले जाते. 

मिठागरांची डागडुजी होऊन शेत लागवडीसाठी तयार झाले की दोन इंच पातळीइतके पाणी आगरात घेऊन स्ल्युस गेट बंद केली जाते. हे पाणी नंतर सूर्यप्रकाशात वाळण्यासाठी सोडून दिले जाते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी फोयेच्या (पाणी हलवण्यासाठी वापरण्यात येणारा मोठा चमचा) आधाराने अधूनमधून हे पाणी हलवले जाते. 

मीठ लागवडीला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक आगराच्या कोपऱ्यात एक छिद्र केले जाते. या छिद्रातून आवश्यक प्रमाणात पाणी आत घेतले जाते. वाफेमुळे तयार होत असलेल्या मीठात सतत खारे पाणी मिसळल्याने मीठाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होते. याला मीठ पिकवणे असे म्हणतात. उत्पादित मीठाचे प्रमाण कमी असल्यास किंवा मीठ पिकण्याची प्रक्रिया मंदावलेली दिसत असल्यास उत्पादकता वाढवण्यासाठी पूर्वी पिकवलेले मीठ शिंपडले जाते. मीठाचा खारटपणा वाढवण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरतो.

मिठागरातून विविध प्रकाराचे मीठ तयार होते, जसे की सैंधव मीठ, पादेलोण (ब्लॅक सॉल्ट), साधे समुद्री मीठ (कॉमन सॉल्ट) इत्यादी. मिठागरात तयार केलेले मीठ नैसर्गिक असते, त्यात इतर कोणतीही प्रक्रिया नसते, त्यामुळे हे मीठ आरोग्यासाठी चांगले मानले जाते. मीठ उत्पादन प्रक्रियेच्या सुरुवातीला तपकिरी मीठाचे स्फटिक मिळतात जे तितकेच खारट असते परंतु त्याच्या रंगामुळे ते टाकाऊ उत्पादन मानले जाते. हे सुरुवातीचे उत्पादन झाडांची लागवड करण्यासाठी वापरले जाते. मासळी जास्त काळ टिकावी 

म्हणून फार्मिलिन नावाच्या विषारी रसायनाचा वापर करण्यात येत असल्याची खळबळजनक बातमी आली होती. फॉर्मेलिनयुक्त मासे आरोग्यासाठी हानिकारक असतात. या माशांना सैंधव मीठाच्या पाण्यात बुडवल्याने किंवा सैंधव मीठाने मॅरीनेट केल्याने फॉर्मेलिनचा प्रभाव कमी होण्यास मदत होत असल्याचा दावा डॉक्टर करतात. 

मीठ आयोडीनयुक्त असो किंवा रॉक सॉल्ट, ते माफक प्रमाणात सेवन करावे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी, मीठाचे माफक प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अवेळी पडणारा पाऊस, शेतात साचणारे पाणी आणि बंधाऱ्यांना जाणूनबुजून केलेल्या नुकसानीमुळे मीठाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. हंगामी पद्धतींमध्ये बदल आणि हवामानातील तीव्र बदलांमुळे शेतकऱ्यांना मीठ शेती करणे कठीण होत असल्याचे मीठ शेतकऱ्यांनी सांगितले.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)