१० वर्षांत २५,७६२ जणांकडून त्याग : गेल्या चार वर्षांत देश सोडणाऱ्यांत वेगाने वाढ
पणजी : राज्यात १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०२४ मागील दहा वर्षांत २५,७६२ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे. ही आकडेवारी पाहिली असता, वर्षाला सरासरी २,५०० गोमंतकीय नागरिकत्व त्याग करत आहेत. तर दिवसा सरासरी ६ ते ७ गोमंतकीय भारतीय नागरिकत्व त्याग करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय मागील चार वर्षांत यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही समोर आले आहे.
गोव्यावर पोर्तुगिजांचे ४५० वर्ष राज्य होते. १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगिजांपासून गोवा मुक्त झाल्या. त्यापूर्वी जन्मलेल्या अनेक गोमंतकीय नागरिकांची पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी झाली आहे. केवळ पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणीकृत असल्यामुळे, तो पोर्तुगीज नागरिक होत नाही. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळेपर्यंत भारतीय पासपोर्ट रद्द करता येत नाही. असे असताना अनेक नागरिक पोर्तुगीज नागरिकत्व मिळविण्यात अग्रेसर असतात. पोर्तुगीज नागरिकत्व प्राप्त झाल्यामुळे युरोपियन देशांचा त्यांना लाभ मिळतो. त्यामुळे अनेक नागरिक भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्याचे मुख्य कारण आहेत. याशिवाय कॅनडा, अमेरिका, रशिया, पोलंड, जर्मनीचे आणि जपान या देशांसह इतर देशाचे नागरिकत्व घेत आहेत.
भारतात दुहेरी नागरिकत्वाचा कायदा नसल्यामुळे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारताच भारतीय नागरिकत्व त्याग करावे लागते. गेल्या काही वर्षांत गोमंतकीयाचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश मंडळी नोकरीसाठी परदेशात जातात. तेथील चांगली नोकरी, आर्थिक सुविधा, चांगले जीवनमान आणि सर्वच दृष्टींनी सुरक्षित जीवन जगण्यासाठी गोव्यातील हजारो लोक भारताचे नागरिकत्व सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होत आहेत. २०२१ पासूनची आकडेवारी पाहिल्यास त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
अनेकांचे पोर्तुगीज नागरिकत्वाला प्राधान्य
गोव्यातील सर्वाधिक नागरिक पोर्तुगीज नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत असल्याचे समोर आले आहे. गोव्यात पूर्वी पोर्तुगाल राज्य करत असल्यामुळे अनेक नागरिक पोर्तुगीज नागरिकत्वाला प्राधान्य देत आहेत.