पणजी : मार्च महिन्यात गोव्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर राष्ट्रीय सरासरी पेक्षा अधिक होता.
मार्च महिन्यात देशभरात अन्न धान्य, भाजीपाला कपडे यांच्या किमतीत किरकोळ घट झाली. यामुळे राष्ट्रीय महागाई दर ३.३४ टक्के इतका राहिला. हा मागील सहा वर्षातील सर्वात कमी महागाई दर ठरला आहे. असे असले तरी मार्चमधील गोव्यातील महागाई दर हा मागील १४ महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच ५.६३ टक्के राहिला.
याआधी गोव्यात फेब्रुवारी २०२५ मध्ये महागाई दर ४.७५ टक्के तर जानेवारी मध्ये ४.६९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तर मे २०२४ मध्ये महागाई दर सर्वात कमी म्हणजे १.४ टक्के होता. मार्च २०२५ मध्ये महागाई दर जास्त असण्याच्या यादीत गोवा देशात दुसऱ्या स्थानी राहिला. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार मार्चमध्ये तेलंगणा येथील महागाई दर सर्वात कमी म्हणजे १.०१ टक्के होता.
अहवालानुसार फेब्रुवारी २०२५ च्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये अन्नधान्य, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, इंधन आदी क्षेत्रातील कमी झालेल्या किमतीमुळे महागाई दर कमी झाला आहे. अन्नामध्ये प्रामुख्याने आले, फ्लॉवर, जिरे, लसूण यांचे दर कमी झाले.
असे असले तरी गतवर्षीच्या मार्चच्या तुलनेत यंदाच्या मार्च मध्ये, सोने, चांदी, द्राक्षे, नारळ आणि खोबरेल तेलाचे भाव वाढले आहेत.
झारखंड दुसऱ्या स्थानी
अहवालानुसार तेलंगणानंतर महागाई दर कमी असण्यात झारखंड (२.०८ तक्के), आंध्र प्रदेश (२.५ टक्के), सिक्कीम (२.३४ टक्के), गुजरात (२.६३ टक्के), राजस्थान (२.६६ टक्के), उत्तर प्रदेश (३.०१ टक्के), बिहार (३.११ टक्के), अरुणाचल प्रदेश (३.०५ टक्के), हिमाचल प्रदेश (३.२ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर केरळ (६.५९ टक्के), कर्नाटक (४.४४ टक्के), जम्मू आणि काश्मीर (४ टक्के) या राज्यातील महागाई दर तुलनेने अधिक होता.