राज्यात भंडारी समाज करणार आपला स्वतंत्र सर्वे

समाजाच्या प्रश्नांवर भाजपची सकारात्मक चर्चा : दामू नाईक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 12:42 am
राज्यात भंडारी समाज करणार आपला स्वतंत्र सर्वे

भंडारी समाजातील नेत्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सा‍ेबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक.

पणजी : भंडारी समाजाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी समाजातील माजी मंत्री आणि आमदारांशी गुरुवारी चर्चा केली. सरकार २०२६ मध्ये जनगणना करणार आहे. यापूर्वी भंडारी समाज खासगी जनगणना करणार, अशी माहिती उपस्थित नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. भंडारी समाजाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देतानाच मुख्यमंत्र्यांनी खासगी जनगणनेला मान्यता दिली, अशी माहिती माजी आमदार आणि भंडारी समाजाचे नेते किरण कांदोळकर यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री दिलीप परुळेकर, मिलिंद नाईक, दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, जयेश साळगावकर, माजी आमदार दयानंद सोपटे, किरण कांदोळेकर, श्याम सातार्डेकर आदी भंडारी समाजाचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते. यावेळी भंडारी समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच जनगणनेवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री आणि आमदारांना चर्चेसाठी आमंत्रित केले आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या चर्चेबाबत आम्ही सर्वजण समाधानी आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अध्यक्ष दामू नाईक यांचे आम्ही आभार आहोत, असे कांदोळकर म्हणाले.

भाजप सरकारने ओबीसी आणि एसटीसह सर्व समाजाचे प्रश्न सोडवले आहेत. पक्ष सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करत आहे. या बैठकीत भंडारी समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. भंडारी समाज तसेच ओबीसींकडूनही जनगणनेची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. _ दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष