भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक यांचा आरोप
पणजी : उपेंद्र गावकर यांना गोमंतक भंडारी समाजातून बडतर्फ केल्यानंतर त्यांनी स्थापन केलेली समिती ही पूर्णतः बेकायदेशीर आहे, असा आरोप समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक यांनी एका पत्रकार परिषदेत केला. तसेच उपेंद्र गावकर यांच्या समितीकडून गोमंतक भंडारी समाजाचा नोंदणी क्रमांक वापरून जात प्रमाणपत्र देण्यात आल्यास, नोकरी आणि शिक्षणाच्या बाबतीत संबंधितांना त्रास सहन करावा लागू शकतो, अशीही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
उपेंद्र गावकर यांनी गोमंतक भंडारी समाज केंद्रीय कार्यकारिणी ही वेगळी समिती स्थापन करून जाहीर केली. या पार्श्वभूमीवर देवानंद नाईक यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत गोमंतक भंडारी समाजाने पत्रकार परिषद घेऊन गावकर यांची समिती बेकायदेशीर असल्याचे सांगितले.
२०१८ मध्ये सदस्य नोंदणी आणि निवडणूक खर्चात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप उपेंद्र गावकर यांच्यावर करण्यात आला होता. या कारणामुळे त्यांना समितीतून बडतर्फ करण्यात आले होते, असे नाईक यांनी सांगितले. गावकर यांनी ६३८ सदस्यांची यादी तयार करून त्यांच्याकडून सुमारे ३.३० लाख रुपये शुल्क आकारले होते, मात्र त्याचा योग्य हिशोब दिला नव्हता. याशिवाय, निवडणूक कालावधीत वापरण्यात आलेल्या ९ लाख रुपयांचाही हिशोब त्यांनी दिला नव्हता, असे नाईक यांनी सांगितले.
आपल्या नेतृत्वाखालील समाजाची मूळ व अधिकृत समितीच सरकारकडून मान्यताप्राप्त आहे. जिल्हा निबंधकांकडून ही समिती अधिकृत मानली गेली असून, उपेंद्र गावकर यांच्या समितीने रजिस्ट्रेशन क्रमांकाचा वापर करून जात प्रमाणपत्र दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नाईक यांनी दिला.
जातीय जनगणनेबाबतही दोन्ही गटांमध्ये मतभेद आहेत. गावकर जातीय गणना करण्याचे समर्थन करत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी त्यासाठी काहीही केले नाही, असे देवानंद नाईक यांचे म्हणणे आहे. अधिकृत समितीने सर्वसाधारण सभेत ठराव करून सरकारकडे जातीय गणनेची मागणी सादर केली आहे.
माजी अध्यक्ष अशोक नाईक यांनी गावकर यांच्यावर समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. खासगी पद्धतीने जातीय गणना करणे चुकीचे असून, सरकारच अधिकृत गणना करू शकते. गावकर यांनी समाजाच्या डोळ्यांत धूळ फेकणे थांबवावे, असा नाईक यांनी इशारा त्यांनी दिला.
भंडारी समाजाच्या निवडणुकीत ५९ अर्ज
भंडारी समाजाच्या निवडणुकीत ५९ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १७ उमेदवारांची निवड करण्यात आली. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधित्व मिळाल्याचे सांगून, लवकरच महिला आणि युवक समित्यांचीही निवड केली जाणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.