पणजी : कदंब महामंडळातर्फे सहा मार्गांवर नवीन लक्झरी बस दररोज धावणार आहेत. यातील म्हापसा ते पुणे - शिर्डी, म्हापसा ते बंगळुरू, गोवा ते हैद्राबाद, गोवा ते मुंबई या मार्गांवर वातानुकूलित बस सेवा असणार आहे. तर गोवा-मंगळुरू-धर्मस्थळ व गोवा-हॉस्पेट-हम्पी या दोन मार्गांवर विनावातानुकूलित बस सेवा आहेत. महामंडळाच्या संकेतस्थळावर बुकिंग सेवा सुरू झाली आहे.
म्हापसा ते बंगळुरू आणि परत (एसी स्लीपर) ही बस म्हापसा, पणजी, मडगाव फोंडामार्गे अनमोड, धारवाड हुबळी ते बंगळुरू असा प्रवास करेल. ही बस म्हापशातून संध्याकाळी ५.३० वाजता सुटणार आहे. तर बंगळुरूहून परत संध्याकाळी ७.४५ वाजता सुटणार आहे. म्हापसा ते पुणे-शिर्डी ही बस म्हापशातून संध्याकाळी ५ वाजता सुटेल. ही गाडी पणजी, मडगाव, बांदा, पुणेमार्गे शिर्डीला जाणार आहे.
गोवा-हैदराबाद ही बस मडगावहून दुपारी ४ वाजता सुटणार आहे. ही बस मडगाव, पणजी, म्हापसा, साखळी, बेळगाव, विजयपुरा, कलाबुर्गीमार्गे हैदराबादला पोहचेल. याशिवाय गोवा-मुंबई (धोबी तलाव) या मार्गावर वातानुकूलित स्लीपर बस सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही बस मडगाव येथून संध्याकाळी ६ वाजता सुटेल व पणजी, म्हापसा, बांदा, झाराप, चिपळूण, खेडमार्गे मुंबईला जाणार आहे.
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कदंबने दोन नवीन मार्गांवर बस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील गोवा-मंगळुरू-धर्मस्थळ ही बस कारवार, अंकोला, कुमटा, होन्नावर, भटकळ, कुंडापुरा, उडुपीमार्गे मंगळुरूला जाणार आहे. तर गोवा-हॉस्पेट-हम्पी ही बस फोंडा, अनमोड, हुबळी, कडक, कोप्पलेमार्गे हम्पीला जाणार आहे. अधिक माहितीसाठी कदंबच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.