वक्फ प्रकरणात पाच जणांच्या याचिकांवरच होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : पुढील सुनावणी ५ मे रोजी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
18th April, 01:05 am
वक्फ प्रकरणात पाच जणांच्या याचिकांवरच होणार सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ‘वक्फ कायदा (सुधारणा) २०२५’ च्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात दाखल असलेल्या अनेक याचिकांपैकी केवळ ५ विशिष्ट याचिकांवरच विस्तृत सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. इतर याचिकांवर स्वतंत्रपणे विचार केला जाईल किंवा त्या निकाली काढल्या जाऊ शकतात. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने सांगितले की, या ५ याचिका कायद्यातील काही विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आधारित आहेत, ज्यावर सखोल विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठीच या ५ याचिकांना प्राधान्य दिले जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, दाखल केलेल्या सर्व शेकडो याचिकांवर सुनावणी करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत याचिकाकर्त्याने कोणत्या ५ याचिकांवर न्यायालयाने सुनावणी करावी हे सांगावे. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या यादीनुसार न्यायालयाने भविष्यात अर्शद मदनी, मोहम्मद जमील मर्चंट, मोहम्मद फजलुर रहीम, शेख नुरुल हसन आणि असदुद्दीन ओवैसी यां ५ याचिकांवर सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.
न्यायालयाने नमूद केले की या ५ प्रमुख याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर इतर याचिकांमधील मुद्दे जर वेगळे असतील तर त्यावर स्वतंत्रपणे विचार केला जाईल. गरज वाटल्यास त्या याचिकांनाही या सुनावणीत समाविष्ट केले जाऊ शकते किंवा कायद्याच्या इतर पैलूंसंबंधी असतील तर त्या निकाली काढल्या जाऊ शकतात. या निर्णयामुळे वक्फ कायद्यावरील न्यायालयीन लढाई आता अधिक केंद्रित होणार आहे आणि या ५ याचिकांमधील युक्तिवादांवरच पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.
सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे :
१. न्यायालयाने केंद्र सरकारला या कायद्यातील वादग्रस्त तरतुदींवर एका आठवड्यात आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
२. याचिकाकर्त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाच दिवसांची मुभा देण्यात आली आहे.
३. याचिकाकर्त्यांनी केंद्र सरकारच्या उत्तराचे पुनरावलोकन केल्यानंतरच अंतरिम आदेश जारी केला जाईल.
४. या प्रकरणातील केवळ प्रमुख पाच याचिकांवर सुनावणी घेतली जाईल. उर्वरित याचिका निकाली काढल्या जातील.