वन अधिकाऱ्यांनी दिली माहिती : प्राण्यांच्या कातडीचे नमुने भोपाळ प्रयोगशाळेत पाठवणार
पणजी : बोंडलातील जनावरांची डॉक्टरांकडून दररोज तपासणी केली जात आहे. चाचण्या तसेच प्राण्यांच्या कातडीचे काही नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले जातील. या आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूचा नकारात्मक अहवाल आल्यानंतर बोंडला येथील प्राणीसंग्रहालय पुन्हा उघडले जाणार आहे. तोपर्यंत सदर प्राणीसंग्रहालय जनतेसाठी उघडण्यात येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संसर्गजन्य आजाराने ३ उदमांजरे (सीवेट कॅट) आणि २ रानमांजरींचा (वाईल्ड कॅट) मृत्यू झाल्यानंतर बोंडला प्राणीसंग्रहालय जनतेसाठी बंद करण्यात आले आहे. गेल्या १ एप्रिलपासून सदर प्राणीसंग्रहालय बंद आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी वन विभागाने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पशुवैद्य आणि वन अधिकारी दररोज येथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. जनावरांच्या तपासणीसह त्यांच्यावर विविध औषधोपचार केले जात आहे. सदर विषाणू कसा निर्माण झाला? संसर्ग कसा झाला? याचे कारण अद्याप वन विभागाला सापडलेले नाही. काही जनावरांना संसर्गजन्य रोग होत नाहीत. मात्र, रानमांजरासारख्या जनावरांवर याचा परिणाम होतो, अशी माहिती येथील वन अधिकाऱ्यांनी दिली.