पणजी : मध्यरात्री चोरी! तिघा चोरट्यांनी फोडली चार दुकाने

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th April, 12:58 pm
पणजी : मध्यरात्री चोरी! तिघा चोरट्यांनी फोडली चार दुकाने

पणजी : येथे तीन अज्ञात चोरट्यांनी काल मध्यरात्री जुन्या सचिवालयानजीकच्या परिसरातील चार दुकाने फोडली. आज गुरुवारी सकाळी संबंधित दुकानांचे मालक आपापली दुकाने उघडण्यासाठी आले असता त्यांना हा प्रकार समजला. 

त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. दरम्यान व्हायरल झालेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटवण्यात आली. चोरी करण्यापूर्वी तिघे चोरटे एका दुकानाची रेकी करताना यात दिसत आहेत. या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी चार दुकानांतून रोख रक्कम, मोबाइल आणि इतर वस्तू मिळून सुमारे १.५० लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले.   

तपासादरम्यान, तिघेही चोरटे उत्तरप्रदेश येथील असल्याचे समोर आले. त्यांनी पणजीतील एका लॉजमध्ये काल बुधवारी संध्याकाळी चेकईन केले होते. चोरीनंतर चोरट्यांनी आज सकाळी चेकआउट केले. यासंदर्भात पोलिसांनी वरील माहितीची खातरजमा केल्यानंतर, ते गोव्यातून पसार झाल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांना हे चोरटे कोल्हापूर येथे असल्याचे समजले त्यानुसार, कोल्हापूर पोलिसांच्या सहाय्याने या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पणजी पोलिसांना यश आले. पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीर तरल पुढील तपास करत आहेत.