घरासमोर सापडला मृतदेह : घातपाताची शक्यता कुटुंबीयांकडून व्यक्त
वाळपई : नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील आंबेडे नगरगाव या ठिकाणी २४ वर्षीय श्रवण देविदास बर्वे या तरुणाचा खून झाला. मंगळवारी सकाळी सदर प्रकार उघडकीस आला. दरम्यान, श्रवणच्या कुटुंबीयांनी त्याचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली आहे. वाळपई पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे.
नगरगाव- आंबेडे येथील हनुमान मंदिरापासून जवळपास दोनशे मीटर अंतरावर असलेल्या देविदास बर्वे यांच्या घरासमोर त्यांच्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आढळला. सोमवारी श्रवण याचे वडील देविदास, त्याचा भाऊ व आई होंडा या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या घरामध्ये राहण्यासाठी गेले होते. वडील देविदास सकाळी नगरगाव येथे आले असता गेटच्या समोर श्रवण याचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती त्यांनी वाळपई पोलीस स्थानकात दिली. निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सनिशा नाईक व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला.
प्राप्त माहितीनुसार, श्रवणच्या गळ्यामध्ये दोरी होती. सदर दोरी त्याचे वडील देविदास यांनी काढली. त्याच्या हाताला, कमरेला व गळ्याला जखम झाली होती. पायामध्ये चप्पल होते. यामुळे त्याने आत्महत्या करण्याची शक्यता कमी वाटत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
सदर ठिकाणी असलेल्या अनेक संशयास्पद वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उपनिरीक्षक सनिशा नाईक यांनी घटनेचा पंचनामा केला. अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.
शवचिकित्सा अहवालानंतर युवकाचा मृत्यू कसा झाला? याची माहिती प्राप्त होणार असल्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली असून ते या प्रकरणात अधिक तपास करणार आहेत.
सध्यातरी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देविदास यांनी वाळपई पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. श्रवण याच्या भावानेही घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.
घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आला आहे.
आयपीएल सामना पाहून परतताना घातपात!
श्रवण सोमवारी रात्री उशिरापर्यंत आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गावातील एका घरामध्ये बसला होता. सामना संपल्यानंतर तो झोपण्यासाठी घरी गेला, अशी माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाली. यानंतरच त्याचा घातपात झाल्याची शक्यता आहे.