नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा दोषी तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण

विमानतळावर पोहोचताच एनआयएने केली अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th April, 10:28 am
नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा दोषी तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण

नवी दिल्ली : २००८ मध्ये देशाला हादरवणाऱ्या  मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले असून, त्याला घेऊन आलेले विशेष विमान बुधवारी दिल्लीच्या पालम टेक्निकल विमानतळावर उतरले. येथे विमानतळावर पोहोचताच एनआयएने त्याला अटक केली. 

राणाला थेट एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात आले असून, नंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे. तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये त्याला ठेवण्याची शक्यता आहे. एनआयए व रॉच्या संयुक्त पथकाने राणाला भारतात आणले असून, एनआयए कार्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

कोर्टाने फेटाळली होती याचिका

तहव्वुर राणाने भारतात डिपोर्ट होऊ नये म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्याने स्वतःला पार्किन्सन आजाराने पीडित असल्याचा दावा करत भारतात प्रताडित केलं जाईल असा युक्तिवाद केला होता. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.

एफबीआय कडून २००९ मध्ये अटक

राणाला २००९ मध्ये अमेरिकेतील एफबीआयने अटक केली होती. त्याच्यावर दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाला पाठिंबा देणे, तसेच मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या डेव्हिड हेडलीला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. अटक झाल्यानंतर तो लॉस एंजेलिसच्या डिटेन्शन सेंटरमध्ये कैदेत होता.

२६/११ हल्ल्यात १७५ बळी, ३०० हून अधिक जखमी

२६ नोव्हेंबर २००८ रोजी लश्कर-ए-तैयबाचे १० दहशतवादी करमाळा मार्गे समुद्रातून मुंबईत आले आणि ताज हॉटेल, सीएसटी स्टेशन, लिओपोल्ड कॅफे, नरीमन हाऊस यांसारख्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार व स्फोट घडवून आणले. या हल्ल्यात १७५ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

तहव्वुर राणाच्या भारतात आगमनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयात गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यामध्ये राणाच्या चौकशीची रूपरेषा, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आणि भविष्यातील कायदेशीर प्रक्रिया यावर चर्चा करण्यात आली.


हेही वाचा