पती आणि दिराचे कृत्य; दोघांना पोलिसांनी केली अटक
नागपूर : शहरातील लाडीकर लेआऊटमध्ये राहणाऱ्या डॉ. अर्चना अनिल राहुले (५०) यांचा पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले यांनी मिळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या चारित्र्यावर संशय आल्याने दोघांनी मिळून हा कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
डॉ. अर्चना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. त्या सध्या एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती डॉ. अनिल राहुले रायपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून, त्यांचा मुलगा तेलंगणातील करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
९ एप्रिल रोजी डॉ. अनिल राहुले आपल्या भावासोबत नागपूरमधील लाडीकर लेआऊट येथील घरी आले. त्यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादाच्या दरम्यान, अनिलने अर्चनाचे पाय पकडले आणि भावाने राजू उर्फ रवी राहुले याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात अर्चना यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्यानंतर दोघांनी घराला सेंट्रल लॉक लावून तेथून पळ काढला. तीन दिवसांनंतर, १२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता अनिल पुन्हा घरी आला, आणि त्याला अर्चना यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मृतदेह सडू लागल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. अनिलने त्या क्षणी जोरजोराने रडण्याचे नाटक केले, त्यामुळे शेजारी जमा झाले.
या प्रकारामुळे शेजाऱ्यांपैकी एका महिलेने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला.सुरुवातीला डॉ. अनिल राहुले यांनी घटनेला वळण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि घटनास्थळाचा पंचनामा यामधून विसंगती शोधून काढली.
चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच डॉ. अनिल राहुले आणि त्यांचा भाऊ रवी यांनी गुन्ह्याची कबुली दिली. कौटुंबिक वाद, संशय आणि संवादाचा अभाव हे या गुन्ह्याचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. डॉ. अनिल राहुले आणि त्यांचा भाऊ रवी राहुले यांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.