नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या वाढत्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवा मास्टर प्लान जाहीर केला आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. .
गडकरी यांच्या योजनेनुसार, आता नवीन दुचाकी खरेदी करताना ग्राहकाला दोन आयएसआय प्रमाणित हेल्मेट देणे वाहन उत्पादक कंपन्यांना बंधनकारक असेल. दरवर्षी किमान १० हजार शाळकरी विद्यार्थी विविध कारणांमुळे अपघातात प्राण गमावतात, हे अत्यंत चिंताजनक आहे. ‘राहवीर योजना’ लवकरच सुरू करण्यात येणार असून, अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच, जखमी व्यक्तीला सात दिवसांपर्यंत दीड लाखांपर्यंत वैद्यकीय मदत देण्यात येईल, असे ते म्हणाले.
तसेच रस्त्यांचे बांधकाम आता प्रीकास्ट तंत्रज्ञानाने केले जाणार असून, सर्व रस्त्यांवर हे अनिवार्य केले जाईल. मधल्या व्हेरिएरची उंची ३ फूट केली जाईल आणि दोन्ही बाजूंना झाडे लावून सुरक्षितता वाढवली जाईल. मलेशियन प्रीकास्ट तंत्रज्ञानामुळे प्रकल्प खर्चात आणि प्रदूषणात मोठी घट होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला आहे.