सततच्या मानसिक जाचाला कंटाळून डायगो संतान नाझारेथ आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती.
खानापूर : तालुक्यातील बिडी येथील वृद्ध दांपत्याच्या आत्महत्येप्रकरणी नंदगड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी सोमवारी चिराग जीवराजभाई लक्कड (सुरत, गुजरात) याला अटक केली. या युवकाने डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून वृद्ध दाम्पत्याची तब्बल ४० ते ५० लाख रुपयांची फसवणूक केली होती. सततच्या मानसिक जाचाला कंटाळून डायगो संतान नाझारेथ (वय ८३ वर्ष) आणि त्यांची पत्नी फ्लेविया डायगो नाझारेथ (वय ७९ वर्ष) यांनी आत्महत्या केली होती.या प्रकरणी नंदगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपीकडून डिजिटल अरेस्टसाठी वापरण्यात आलेले दोन मोबाईल फोन्स जप्त केले आहेत. त्याच्यावर आयटी कायद्याच्या कलम ६६(ड) आणि बीएनएसच्या कलम ३(५), १०८, ३०८(२), ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासानुसार, लक्कड याने वृद्ध दाम्पत्याचा मानसिक छळ करून, सुमारे ४० ते ५० लाख रुपयांची रक्कम विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम कोणत्या मार्गाने हस्तांतरित झाली, त्यासाठी कोणत्या अॅप्सचा वापर झाला आणि अजून कोणते सहकारी होते, याचा तपास सुरू आहे
नंदगड पोलिसांनी सायबर क्राईम टीमच्या मदतीने आरोपी चिराग लक्कडला गुजरातमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. बँक व्यवहार, कॉल रेकॉर्डिंग्स, व्हॉट्सअॅप चॅट्स पोलिसांच्या हाती लागले आहेत.आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.