मंत्री गावडे; अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय
पणजी : कला अकादमीच्या नाट्यगृहात ‘पुरुष’ नाटकावेळी घडलेल्या घटनेसंदर्भातील सविस्तर अहवाल आपण सदस्य सचिवांकडून मागवला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या ‘पुरुष’ नाटकाचा प्रयोग नुकताच कला अकादमीच्या नाट्यगृहात पार पडला. परंतु, नाटकादरम्यान पोंक्षे यांचा अभिनय सुरू असतानाच प्रकाश योजनेत बिघाड झाला. त्यामुळे मध्येच नाटक थांबवत ‘दहा मिनिटे पडदा टाकतो आणि पुन्हा येतो’ असे म्हणत पोंक्षे यांनी रजा घेतली होती. या घटनेनंतर विरोधकांनी कला अकादमीवरून पुन्हा एकदा मंत्री गोविंद गावडे आणि सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, आपण या घटनेसंदर्भातील सविस्तर अहवाल सदस्य सचिवांकडून मागवला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कला अकादमीसंदर्भात राज्या सरकारने स्थापन केलेल्या कृतिदलाने अजून सरकारला आपला अहवाल सादर केलेला नाही. परंतु, कामांचा आढावा घेऊन नाट्यगृहातील ध्वनी, प्रकाश योजना आणि रंगमंचासंदर्भात तीन सल्लागारांची नेमणूक करण्याच्या सूचना ‘पीडब्ल्यूडी’ला केल्या होत्या. त्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने ध्वनीसाठी रॉजर ड्रेगो, प्रकाश योजनेसाठी शीतल तळपदे आणि रंगमंचासाठी राजन भिसे यांची नेमणूक केली आहे. या तीन सल्लागारांनी दोनवेळा नाट्यगृहाची पाहणी केली असून, येत्या आठवड्यात त्यांच्याकडून अहवाल सादर होणार आहे. त्यातील शिफारशींनुसार नाट्यगृहाची कामे केली जाणार आहेत.