नागरी पुरवठा खात्यातर्फे एजन्सी नियुक्तीसाठी निविदा जारी
पणजी : राज्यातील रेशन वितरण सोसायट्यांमधील पीओएस मशीन आता आधुनिक केली जाणार आहे. या नवीन तंत्रज्ञानाने सर्व सोसायटींमधील रेशन गोळा करण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने या मशीन्सच्या खरेदीसाठी निविदा जारी केल्या आहेत.
नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने ई-निविदा सूचना जारी करून राज्यभरात ईपीओएस उपकरणांच्या देखरेखीसाठी तसेच आधार आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली लागू करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करून अंमलबजावणी एजन्सी निवडण्यासाठी प्रस्ताव मागवले होते.
याविषयी अधिक माहिती देताना सोसायटीला रेशन पुरवठा करणाऱ्या पीओएस मशीन बदलण्यासाठी आणि चालवण्यासाठी एजन्सी निवडण्यासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती नागरी पुरवठा विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. या पीओएस सॉफ्टवेअर यंत्रणा खाते भाडे तत्त्वावर चालवल्या जातात. मागील एजन्सीचा कार्यकाळ संपला असून नवीन एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. जो सर्वात कमी बोली लावणार त्याला या निविदा मिळणार आहे. या एजन्सीची नियुक्ती ५ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
नवीन मशीनमुळे ग्राहकांना त्वरित मिळणार रेशन
सध्या जी पीओएस यंत्रणा अस्तित्वात आहे त्याजागी नवीन मशीन्स येणार आहे. या मशीनमध्ये आधारचे एल १ स्कॅनर येणार आहे. या मशीनवर बोट ठेवून केली जाणारी स्कॅनिंग प्रक्रिया जलद होऊन ग्राहकांना त्वरित रेशन उपलब्ध होणार आहे. पूर्वीच्या एलओ स्कॅनरमुळे बोटांचे स्कॅन होण्यास विलंब होत असे. या नवीन मशीन्स एजन्सी स्वखर्चाने खरेदी करणार आहे. तसेच केंद्राने अनिवार्य केलेली स्मार्ट पीडीएस प्रणाली दोन वर्षांत लागू केली जाईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.