भोम आंदोलनात राजकारण्यांमुळे पडली फूट

राष्ट्रीय महामार्गाला विरोध करण्याचा निर्धार

Story: प्र‌तिनिधी। गोवन वार्ता |
14th April, 12:28 am
भोम आंदोलनात राजकारण्यांमुळे पडली फूट

भोम येथे  सभेला संबोधित करताना संजय नाईक.

फोंडा : आपली ताकद आणि एकता दाखविण्याच्या प्रयत्नात भोमवासीयांनी गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना रविवारी त्यांच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचे आवाहन केले होते. पण आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे बरेच गावकरी या बैठकीला आले नाहीत. दरम्यान, भोम आंदोलनांत राजकारण्यांनी फूट घातली तरीही स्थानिक भोमकरांनी मंदिर आणि संस्कृती वाचवण्यासाठी एनएच विस्ताराविरुद्ध शेवटपर्यंत लढण्याची प्रतिज्ञा केली.
राष्ट्रीय महामार्ग विस्ताराविरुद्ध उच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल करणाऱ्या खोर्लीतील स्थानिकांनी भोमकरांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. ‍गौरेश गावडे म्हणाले, गेली शेकडो वर्षे भोमवासीय आनंदाने आणि शांततेने राहत होते. पण, आता गावकरी दहशतवादाच्या भीतीने जगत आहेत. बायपासचा पर्याय असूनही, तो नाकारण्यात आला आहे. देव, संस्कृती कशी राखली जाईल, असा प्रश्न त्यांनी केला.
किशोर नाईक म्हणाले, पर्वरी खाप्रेश्वर देवस्थानाबाबत जे घडले तेही भोममध्ये होऊ शकते. भोम परिसरात एवढे लोक आहेत मात्र, बरेच जण घरातच बसून राहिले. ते बैठकीला न आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
भोमला दुसरे खाप्रेश्वर मंदिर बनू देणार नाही
राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी भोम गाव उद्ध्वस्त करण्याचे राजकीय षडयंत्र रचत आहे. काही लोक भीतीने त्यांना भेटायला येण्याऐवजी घरात बसून राहिले. भोममध्ये राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार आणि सागरमाला प्रकल्प लादणे हे एक षडयंत्र आहे. भोमला दुसरे खाप्रेश्वर मंदिर बनू देणार नाही, गाव उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे आंदोलनाचे नेते संजय नाईक यांनी सागितले.