इतर पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव : शेतकरी हवालदील
डिचोली : दरवर्षी पोरसू लागवडीतून मिरची, भाजीपाला, वाल, कांदा लागवड करून आपल्या वर्षभराचा पुरमेत करून मिरची व इतर भाजीपाला विकून चांगला नफा करणाऱ्या या भागातील अनेक शेतकऱ्यांना यावर्षी मिरचीला विशिष्ट प्रकारचा फंगस लागल्याने तसेच भेंडी कांदा व इतर पिकावरही विशिष्ट प्रादुर्भाव झाला असून सुमारे ६० टक्के नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
प्रगतशील शेतकरी विश्वास चोडणकर यांच्या पोरसू लागवडीत मिरचीला पिकल्यानंतर फंगस धरत असून त्यामुळे ५० टक्क्याहून अधिक मिरचीचे पीक धोक्यात आले आहे. त्याचबरोबर गावठी भेंडी तसेच इतर भाजीपाल्याला फंगसचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान होत असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
या संदर्भात शेतकऱ्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधल्यानंतर कृषी अधिकारी नीलिमा गावस तसेच जोग व इतर अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन मिरची लागवड व इतर लागवडीची तपासणी केली. यावेळी पिकाला एक विशिष्ट प्रकारचा फंगस झाल्याचे आढळून आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
तालुक्यात अनेक ठिकाणी शेकडो कष्टकरी शेतकरी पोरसू लागवडीतून मिरची व इतर लागवड करून पुरुमेत करून मोठ्या प्रमाणात विक्री करतात. त्यामुळे त्यांना चांगला नफाही प्राप्त होत असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. मात्र, यंदा मिरची लागवडीवर संक्रांत आल्याने तयार झालेली मिरची पांढरी पडत असल्याचे आढळून आल्याने ५० ते ६० टक्के नुकसान सोसावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेली साठ वर्षे आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोरसू लागवड करून मिरची, कांदा, वाल व इतर पिके घेत आहोत. पूर्वीची परिस्थिती बिकट होती. लाटेने पाणी काढावे लागत असे मात्र, गेल्या काही वर्षांत सरकारी योजनांच्या माध्यमातून स्प्रिंकलर्स बसवल्याने काम सोपे झाले आहे. मात्र गेल्या चार-पाच वर्षांत गावठी कांद्याचे पीक घेणे कठीण झाले असून रोग आल्याने बियाणे नष्ट झाल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी मिरची पीक खूप चांगले आले आहे. मात्र, त्याला फंगस लागल्याने मिरची पांढरी पडत असल्याने ५० टक्केहून अधिक नुकसान सोसावे लागत असल्याचे कमलावती चोडणकर या ज्येष्ठ शेतकरी महिलेने सांगितले.
कृषी खात्याने यासंदर्भात पाहणी करून आपला अहवाल घेतला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मिरची व इतर लागवडील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी बांधवांनी केली आहे.
पोरसू लागवड धोक्यात; सरकारकडे मदतीची मागणी
विश्वास चोडणकर हे गेली अनेक वर्षे पोरसू लागवडीतून मिरची, कांदा, वाल, भाजीपाला या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री करून आपला चांगला निर्वाह करतात एक प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांना सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकरी दरवर्षीप्रमाणे पोरसू लागवड करून वर्षभराची पुरुमेतची तयारी करून माल विक्री करतात. मात्र, यंदा त्यांना मोठा फटका बसल्याने सरकारने मदत पुरवावी, अशी मागणी होत आहे.