हरमल सचिवांच्या बदलीची मागणी

उद्धट वागणुकीमुळे ग्रामसभेत नागरिकांकडून संताप

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
14th April, 12:18 am
हरमल सचिवांच्या बदलीची मागणी

हरमल ग्रामसभेत ग्रामस्थांच्या प्रश्नांना जाब देताना सरपंच अनुपमा मयेकर. सोबत सचिव सुभाष कांबळी, संतान फर्नांडिस, गुणाजी ठाकूर, भिकाजी नाईक व इतर.

हरमल : गेल्या ग्रामसभेत मधलावाडा प्रभागात ‘हर घर जल’ योजनेच्या बाबतीत घेतलेला ठराव इतिवृत्तात न घेतल्याने ग्रामस्थ मार्सेलीन फर्नांडिस यांनी संताप व्यक्त केला. ग्रामसभेतील ठरावाची कार्यवाही करीत नसल्याने तसेच कार्यालयात उद्धट, उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पंचायत सचिवाची बदली करण्याची मागणी ग्रामस्थ एडविन डिसोझा यांनी केली.
दरम्यान, पंचायत सचिव ग्रामस्थांच्या प्रश्नाना जाब देऊ शकत नाही, तो पंच वगैरे कोणी नसल्याने त्याने सरपंचांना माहिती द्यावी ग्रामस्थांना नव्हे, असे सांगून डिसोझा यांनी हरकत घेतली व सरपंचांनी उत्तर द्यावे, असे सुचवले.
सदर ग्रामसभा सरपंच अनुपमा मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पंचायत सचिव सुभाष कांबळी यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला व नागरिकांनी त्यास हरकत घेतली. सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेबाबत ठराव घेतला होता व मार्सेलीन फर्नांडिस यांनी या योजनेचा लाभ वाड्यावर मिळाला नाही, असे सांगितले होते. विहिरीचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आहे, शिवाय खाडीचे पाणी दूषित असल्याने पंचायतीने आरोग्य खात्यास कळवून तपासणी करण्याची मागणी फर्नांडिस यांनी केली.
पंचायत क्षेत्रातील कोर्ट प्रकरणात पंचायत सचिव जातो. मात्र, अन्य पंचायतीचे सरपंच जातीनिशी उपस्थित असतात. या प्रकरणात सचिव आवश्यक माहिती वकिलास देत नसल्याचा आरोप डिसोझा यांनी केला. ग्रामस्थांना उद्धट उत्तरे देत असल्याने या सचिवाची बदली करावी व यापुढे पंचायत सरपंचांनी कोर्ट प्रकरणात भाग घ्यावा, असा ठराव डिसोझा यांनी मांडला व संमत केला.
सरकार उड्डाण पूल व अन्य कामात बड्या उद्योजकांच्या इमारती वगळून कामे करीत आहेत. मात्र, गावातील सामान्य नागरिकांच्या घरादारावर बुलडोझर फिरवू पाहत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे पंचायतीने बैठक घेण्याचे तत्त्वतः मान्य केले व गावात आवाजी माहिती दिल्यानंतर बैठक घेण्याचे सरपंच मयेकर यांनी मान्य केले.
पंचायत प्रभागात कचऱ्याची उचल होत नाही. येथील कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली व त्यासाठी जागाही निश्चित करून कॅमेरे घेण्याचा ठराव संमत केला. तसेच मधलावाडा भागात अरुंद रस्त्यामुळे कचरावाहू वाहन जात नसल्याने त्या भागात कचरा पेटी देण्याचे सरपंच मयेकर यांनी मान्य केले.
पंचायत सचिवापासून सावध राहा : फर्नांडिस
आपणाकडे व्यवसाय चालविण्याचा परवाना असूनही, सचिवाने चुकीची माहिती वकिलास दिली व आपले आस्थापन सिल केले गेले व गेली चार वर्षे नुकसानी सोसत आहे. पंचायत सचिवांच्या चुकीमुळे आपली नुकसानी झाली, या सचिवापासून सावध राहण्याचा इशारा फर्नांडिस यांनी दिला.