मुख्यमंत्र्यांचे आवाहन : पणजीत ओडिशा उत्कल दिन साजरा
कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व इतर.
पणजी : जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावाखाली काही राजकीय पक्ष जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी ओडिशातील नागरिकांना केले.
पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित ओडिशा उत्कल दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने ओडिशातील अनेक नागरिक गोव्यात स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या आणि गोमंतकीयांच्या संस्कृतीतही साम्य आढळून येते, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. ओडिशातील जगन्नाथ रथ ओढण्याचा मान नेहमीच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी होते. त्यामुळे सभापती या नात्याने हा मान आपल्याला मिळाला. आपण त्यावेळी ओडिशाला जाऊन जगन्नाथ रथ ओढला आणि जगन्नाथांच्या कृपेमुळे २०१९ मध्ये मुख्यमंत्रीही झालो, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ओडिशा आणि गोवा या दोन राज्यांत पर्यटन, खाण, समुद्र किनारे यांसह इतर अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. पंतप्रधान नरेंंद्र मोदींचे विकसित भारत-२०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे, असे सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.
भाजपलाच मते द्या : दामू नाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार देशातील सर्वच राज्यांचा झपाट्याने विकास साधत आहे. गोव्याच्या विकासाची गंगा पुढील काळात अशीच सुरू ठेवण्यासाठी गोव्यात स्थायिक झालेल्या ओडिशावासीयांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनाच मते देणे गरजेचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले.