आकेपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी रेल्वे अधिकार्‍यांची पाहणी

हॉटेल ला फ्लोर ते व्हिक्टर हॉस्पिटल मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 11:43 pm
आकेपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी रेल्वे अधिकार्‍यांची पाहणी

मडगाव शहारातील आकेपर्यंतच्या उड्डाणपुलासाठीची पाहणी करताना रेल्वे अधिकारी.

मडगाव : मडगाव शहरातील (Madgaon city) वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘हॉटेल ला फ्लोर ते व्हिक्टर हॉस्पिटल’ (Hotel La Fleur and Victor Hospital) या उड्डाणपुलाच्या (Flight bridge) उभारणीला वेग आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या रेल्वेच्या जमिनीसंदर्भात शनिवारी भारतीय रेल्वेच्या अधिकार्‍यांनी आणि सरकारी सल्लागारांनी प्रत्यक्ष जागेची संयुक्त पाहणी केली. सुमारे ९० कोटी रुपयांचा हा प्रकल्प मडगावच्या पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या उड्डाणपुलाचा मार्ग ओल्ड स्टेशन परिसरातून आणि रेल्वे मार्गाला समांतर जात असल्याने रेल्वेच्या अखत्यारितील जमिनीची आवश्यकता आहे. यापूर्वी ना-हरकत प्रमाणपत्रमिळण्यास विलंब झाल्याने प्रकल्प रखडला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. केंद्राने या प्रकल्पाला संमती दिल्यामुळे आता निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा उड्डाणपूल कोंब ते आके या परिसराला जोडण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या पुलामुळे मडगावचा रिंग रोड प्रकल्प पूर्णत्वास येईल आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीअंतर्गत या प्रकल्पाचा प्रस्ताव नोव्हेंबर २०२३ मध्ये केंद्राकडे पाठवण्यात आला होता.
दोन उड्डाणपुलांचे नियोजन
राज्य सरकारने मडगावसाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीअंतर्गत ‘हॉटेल ला फ्लोर ते व्हिक्टर हॉस्पिटल उड्डाणपूल’ आणि केंद्राच्या सेतू बंधन योजनेतून ‘कोंब रेल्वे उड्डाणपूल’ हे दोन महत्त्वाचे प्रस्ताव दिले होते. जून २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची प्राथमिक पाहणी केली होती. आता रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.       

हेही वाचा