साखळीत वाळवंटी नदी सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणी

शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची : मुख्यमंत्री

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
04th January, 11:48 pm
साखळीत वाळवंटी नदी सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणी

वाळवंटीच्या सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, ब्रह्मानंद देसाई, दीपा जल्मी, रश्मी देसाई व इतर.

साखळी : साखळी शहराचा विकास नियोजन आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता, त्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. आता हे शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवणे ही प्रत्येक साखळीवासीयाची जबाबदारी आहे. जेव्हा शहर सुंदर असेल, तेव्हाच येथे राहण्याची लोकांची ओढ वाढेल आणि व्यवसायालाही गती मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साखळी नगरपालिका सभागृहात अमृत मिशन २.० अंतर्गत ८ कोटी रुपयांच्या वाळवंटी नदी सुशोभीकरण प्रकल्पाच्या पायाभरणीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, निकिता नाईक, रश्मी देसाई, दीपा जल्मी, अंजना कामत, मुख्याधिकारी श्रीपाद माजिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व श्रीफळ वाढवून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पात भव्य प्रवेशद्वार आणि आकर्षक बालोद्यान, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक आणि खुले जिम, निसर्गरम्य खुले उद्यान आदी विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
याव्यतिरिक्त शहरातील महत्त्वाच्या विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सुपाचीपुड ते सरकारी इस्पितळ आणि दत्तवाडी पुलापर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरण सुरू आहे. बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याचे सुशोभीकरण आणि बाजारपेठेत आधुनिक सोयी-सुविधा लवकरच उपलब्ध केल्या जातील, असेही ते म्हणाले.
‘सुंदर साखळी’चे स्वप्न साकार
२०१२ मध्ये दिलेला ‘हरित हरवळे, विकसित विर्डी व सुंदर साखळी’ हा नारा आज प्रत्यक्षात उतरत आहे. साखळीत केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध असल्याने लोक येथे वास्तव्याला पसंती देत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई
नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना सांगितले की, साखळीच्या विकासासाठी मुख्यमंत्री 'जादूची कांडी' ठरले आहेत. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नगरपालिकेला मुख्यमंत्र्यांनी पूर्ण अधिकार दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा