गोवा कर्मचारी निवड आयोगाचा निर्णय

पणजी : गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध खात्यांमधील २१९ पदांसाठी सुरू असलेल्या नोकरभरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत आता ९ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार होती, मात्र तांत्रिक कारणास्तव किंवा उमेदवारांच्या सुविधेसाठी यात ९ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
आयोगामार्फत गट-क संवर्गातील विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये तलाठी ३० पदे, लॅब सहाय्यक (४६), पंचायत सचिव (२६), तपासक (२७), लॅब तंत्रज्ञ (१७), वरिष्ठ लिपिक (१२), खाते लिपिक (१२) या व्यतिरिक्त माहिती सहाय्यक (६), निरीक्षक (५), स्टोअर कीपर (४), कनिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ (७) आणि इतर तांत्रिक पदांचाही यात समावेश आहे.
परीक्षा तारीख लवकरच होणार जाहीर
आयोगाने स्पष्ट केले आहे की, इच्छुक उमेदवारांनी केवळ आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. इतर कोणत्याही (ऑफलाईन) मार्गाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व अटी आणि सूचना काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुदत संपल्यानंतर अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यानंतर परीक्षेची तारीख आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. आरक्षणाच्या नियमानुसार काही पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. जे उमेदवार पात्र नाहीत, त्यांनी अर्ज करू नये, अशी सूचनाही आयोगाने दिली आहे.