‘वुडन हॉम्स इंडिया’ रचणार ८ तासांत घर बांधण्याचा विक्रम

‘बिग बॉस’ ट्रॉफीचे प्रदर्शन : श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ७ जानेवारीला आयोजन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 11:24 pm
‘वुडन हॉम्स इंडिया’ रचणार ८ तासांत घर बांधण्याचा विक्रम

पणजी येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना अनिल खंवटे. सोबत सिजर फर्नांडिस, मॅक वाझ.

पणजी : गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर (Shyama Prasad Mukherjee Stadium) ७ ते ९ जानेवारी २०२६ या काळात रंगणाऱ्या ३२ व्या ‘अखिल भारतीय बिल्डर परिषदे’त (All India Builders Council) एक अनोखा विश्वविक्रम साकारला जाणार आहे. ‘वुडन होम्स इंडिया’ (Wooden Homes India) ही संस्था अवघ्या ८ तासांच्या विक्रमी वेळेत ३४० चौ.मी. आकाराचे भव्य लाकडी घर बांधून 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव नोंदवणार आहे.अखिल भारतीय बिल्डर परिषदेचे सह-निमंत्रक अनिल खंवटे यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत या विक्रमाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला वुडन होम्स इंडियाचे सिजर फर्नांडिस आणि काजू फेणी डिस्टिलर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मॅक वाझ उपस्थित होते.
बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून या घराच्या बांधकामाला सुरुवात होईल. हा संपूर्ण सोहळा प्रत्यक्ष (लाईव्ह) पाहता येणार असून ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे अधिकारी या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून नोंदी करणार आहेत. दरम्यान, ३२ व्या अखिल भारतीय बिल्डर परिषदेचा हा विश्वविक्रम एक अविभाज्य भाग असेल, ज्यामुळे गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
‘बिग बॉस ब्रेव्ह हार्ट’ ट्रॉफीचे आकर्षण
या विक्रमी वेळेत बांधल्या जाणाऱ्या घरात भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचे प्रतीक असलेली ‘बिग बॉस ब्रेव्ह हार्ट’ ही विशेष ट्रॉफी प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. ही ट्रॉफी पुण्यातील नामांकित कलाकार माधुरी भादुरी यांनी तयार केली असून, ‘मदाम रोसा डिस्टिलरी’च्या ‘बिग बॉस’ ब्रँडच्या ५० व्या वर्षानिमित्त ती साकारण्यात आली आहे. नुकतेच राजभवनात फोंमेंतो समूहाचे अध्यक्ष अवधूत तिंबलो यांच्या हस्ते या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले असून, ती राज्यपालांना भेट देण्यात आली आहे, अशी माहिती खंवटे यांनी दिली.

हेही वाचा