नाव नोंदणीसाठी २,०३१, तर वगळण्यासाठी १५५ अर्ज

पणजी : राज्यातील मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी (sir) झाल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer) कार्यालयाने मसुदा मतदार यादी (Drafted Voters' List) जाहीर केली होती. या यादीबाबत १७ डिसेंबर ते ३ जानेवारी या १७ दिवसांच्या कालावधीत २,१८६ आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये यादीत नाव नोंदवण्यासाठी २,०३१ तर नाव वगळण्यासाठी १५५ अर्ज आले आहेत. मसुदा यादीत नाव घालणे अथवा वगळण्यासाठीची अंतिम मुदत १५ जानेवारीपर्यंत असणार आहे.
एसआयआरनंतर आयोगाने १ लाख ४२ मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. दरम्यान, १ लाख ८२ हजार ४०३ मतदार अद्याप ‘मॅप’ झालेले नाहीत. या मतदारांची नावे मसुदा यादीत समाविष्ट असली, तरी त्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे नाव २००२ च्या यादीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा मतदारांना आता भारतीय नागरिकत्वाचा ठोस पुरावा सादर करावा लागणार आहे. यासंदर्भात आयोगाने संबंधितांना नोटिसा बजावल्या असून सध्या सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे.
नाव वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी
मृत मतदार वगळता ज्या मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत आणि ज्यांना ते चुकीचे वाटते, अशांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. असे मतदार 'अर्ज ६' भरून आपले दावे सादर करू शकतात. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली जातील. नाव घालण्यासाठी किंवा वगळण्यासाठी १५ जानेवारी २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
१४ फेब्रुवारीला अंतिम यादी होणार प्रसिद्ध
मुख्य निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व आक्षेपांवरील सुनावणी ७ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून ते निकाली काढले जातील. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून १४ फेब्रुवारी रोजी राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. विशेष म्हणजे, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने या मसुदा यादीवर अधिकृत आक्षेप नोंदवलेला नाही.