भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव नियंत्रणासाठी केटीसीचा निर्णय

म्हापसा कदंब बस स्थानकाच्या सीमेवर केटीसीकडून उभारल्या जाणार्या तारांच्या कुंपणाला आक्षेप घेणारे दुकानदार.
म्हापसा : कदंब परिवहन महामंडळाने (केटीसी) म्हापसा येथील जुन्या बसस्थानकाच्या सीमेसभोवती तारेचे कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर नियंत्रण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही म्हाणून हे काम हाती घेतले आहे. परंतु, बसस्थानकाच्या शेजारील पालिकेच्या आराम सोडा इमारतीमधील दुकानदारांनी याला तीव्र आक्षेप घेतला आहे. हे कुंपण उभारल्यास सुमारे ४० दुकानदार कुटुंबियांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याने केटीसीने आपली योजना मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शनिवारी ३ रोजी केटीसीने बसस्थानकाच्या सीमेवर सहा फूट उंचीचे तारांचे कुंपण घालण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम हाती घेतले. या कामाला शेजारील म्हापसा नगरपालिकेच्या इमारतीमधील दुकानदारांनी हरकत घेतली. त्यामुळे कदंब महामंडळाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता संबंधित दुकानदारांनी आपली कैफियत मांडली. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहोत, असे केटीसीच्या अधिकार्यांनी दुकानदारांना यावेळी सांगितले.
दुकानदारांनी सांगितले की, आमच्या दुकानांच्या समोर बस स्थानक आहे. त्यामुळे ग्राहक थेट दुकानापर्यंत येतात. मात्र सहा फूट उंचीचे तारेचे कुंपण घातल्यास दुकानांची दृश्यमानता रोखली जाईल आणि ग्राहकांना येण्यास अडथळा निर्माण होईल. या दुकानांमधून मिळणारे उत्पन्न हे आमचे उपजीविकेचे एकमेव साधन आहे. जर कुंपणाचे बांधकाम केल्यास आमचे दैनंदिन उत्पन्न हिरावले जाईल, असा दावा दुकानदारांनी केला आहे.
दरम्यान, भटक्या कुत्र्यांकडून सर्वसामान्य नागरिकांवर होणार्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती. सार्वजनिक ठिकाणांवरून सर्व भटक्या कुत्र्यांना तातडीने हटवावे. या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी बस स्थनक, बस थांबे, शाळा, महाविद्यालय, इस्पितळ, रेल्वे स्थानक परिसराच्या सभोवताली तारेचे कुंपण घालावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता.
व्यवसाय ठप्प होण्याची भीती
कदंब महामंडळाकडून कुंपणात जरी एक मीटरची चार गेट्स ठेवली जाणार असली, तरी आपत्कालीन वेळी किंवा दुकानात माल भरताना त्याचा मोठा त्रास होईल. ग्राहकांच्या प्रवेशावर निर्बंध आल्यास आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होईल, असा दावा दुकानदारांनी केला आहे.
दुकानदार उपसभापतींची घेणार भेट
याविषयी संबंधित दुकानदारांनी म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन सादर केले असून, येत्या सोमवारी ५ रोजी दुकानदार आपली कैफीयत मांडण्यासाठी स्थानिक आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांची भेट घेणार आहेत.