मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळीत वाटप

डिचोली: अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या राज्यातील ३,९५० शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. शनिवारी डिचोली आणि साखळी येथे आयोजित विशेष कार्यक्रमांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते एकूण ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले. 'शेतकरी आधार निधी' योजनेअंतर्गत ही मदत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
संकट काळात सरकार खंबीर:
मुख्यमंत्री यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, शेतकरी हा समाजाचा मजबूत कणा आहे. बदलत्या हवामानामुळे जेव्हा कष्टाचे पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होते, तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे सरकारचे कर्तव्य आहे. संकटात सापडलेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे. ज्या १,२०० हून अधिक शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड नव्हते, त्यांनाही सरकारने विशेष बाब म्हणून मदत उपलब्ध करून दिली आहे. बहुतेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून, तांत्रिक कारणांमुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसांत मदत मिळेल.
समूह शेती आणि वायंगणीवर भर मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केवळ भात पिकावर अवलंबून न राहता 'समूह शेती' (Community Farming) आणि 'वायंगणी' (रब्बी) पिकांकडे वळण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, समूह शेतीची संकल्पना खऱ्या अर्थाने किफायतशीर असून आमोणा, कुडणे आणि न्हावेली येथे हा प्रयोग यशस्वीपणे सुरू झाला आहे. जिल्हा पंचायतींना या योजनेसाठी अधिक अधिकार देण्यात येतील. पावसाळ्यातील नुकसानीची जोखीम टाळण्यासाठी वायंगणी शेतीतून जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
पारदर्शक आणि जलद प्रक्रिया
कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी माहिती दिली की, डिसेंबरअखेर ही मदत देण्याचे उद्दिष्ट होते, परंतु जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला थोडा विलंब झाला. तरीही, अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही मदत वितरित करण्यात यश आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, महेश सावंत, पद्माकर मळीक, दयानंद कारबोटकर, नीलिमा गावस, कुंदा मांद्रेकर आणि कृषी खात्याचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
आमदारांनी व्यक्त केला विश्वास
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले की, प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता १०० टक्के पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशा संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले की, सरकार जनतेच्या पाठीशी खंबीर असून मुख्यमंत्री प्रत्येक क्षेत्रात जनतेसाठी आधारवड म्हणून कार्य करत आहेत.
कृषी संचालकांचे स्पष्टीकरण
कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी विविध योजनांची माहिती देताना सांगितले की, अवकाळी पावसानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने डिसेंबरपर्यंत मदत देण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला थोडा विलंब झाला असला, तरी आता १०० टक्के मदत वितरित करण्यात यश आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, महेश सावंत, पद्माकर मळीक, दयानंद कारबोटकर, नीलिमा गावस, कुंदा मांद्रेकर, कृषी अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.