गोवा विद्यापिठातील संशोधकांच्या अभ्यासातून माहिती पुढे

पणजी : गोव्यातील (Goa) करंझाळे (Caranzalem) समुद्रकिनाऱ्यावर (Beach) पकडलेल्या मासळीमध्ये (Fish) जड धातूंचे प्रमाण जास्त असते, असे गोवा विद्यापीठाच्या (Goa University) संशोधकांनी केलेल्या एका नव्या वैज्ञानिक अभ्यासातून पुढे आले आहे. नियमित ही मासळी खाल्ल्यास आरोग्याला धोका संभवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
या अभ्यासात असे आढळून आले आहे की, सामान्यतः सेवन केल्या जाणाऱ्या अनेक माशांच्या प्रजातींमध्ये धातूंचे प्रमाण परवानगी योग्य मर्यादेपेक्षा जास्त आहे. किनारी भागातील मासेमार व मासळी खाणाऱ्यांची चिंता वाढवणारी ही बाब आहे. जड धातूंचे प्रमाण जास्त असलेली मासळी अधिक प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला अपायकारक असून, गोव्यातील शहरी किनारपट्टीवरील मासळीच्या सुरक्षिततेवर अधिक बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे या संशोधनातून पुढे आले आहे.
ए.एम. पाटील, एम. आर. नास्नोडकर व सी.जे.जी. फर्नांडिस यांनी करंझाळे समुद्रकिनाऱ्यावरील ‘गाळामधील धातूंची जैवउपलब्धता आणि खाण्यायोग्य मासळीतील जैवसंचय’ या अभ्यासात गाळामधील धातूंच्या जैवउपलब्धतेचे मूल्यांकन करणे व मासळीच्या विविध अवयवांमध्ये म्हणजेच स्नायू, कल्ले, यकृत, मूत्रपिंड यातील धातूंच्या प्रमाणाचे परिमाणीकरण करणे, या हेतूने संशोधन केले होते. त्यात सागरी जीव आणि मानव या दोघांसाठी विषारी परिणामांचे मूल्यांकन करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.
या अभ्यासात बहुतेक मासळीच्या प्रजातींमध्ये मूत्रपिंडात धातूंचा संचय सर्वाधिक दिसून आला. त्यानंतर यकृत, कल्ले आणि स्नायू यात दिसून आला. बांगडे, तारले यांच्यासहीत खाल्ले जाणाऱ्या ११ प्रकारच्या मासळीमध्ये धातूंचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.