साळगाव दुहेरी खून प्रकरण : संशयित जगन्नाथ भगतविरुद्ध 'लुक आऊट' नोटीस जारी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
32 mins ago
साळगाव दुहेरी खून प्रकरण : संशयित जगन्नाथ भगतविरुद्ध 'लुक आऊट' नोटीस जारी

म्हापसा : मुड्डोवाडा-साळगाव येथील दुहेरी खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी जगन्नाथ रामचंद्र भगत (रा. बिरगाव, छत्तीसगड; मूळ रा. सुंदरगड, ओडिशा) याच्याविरुद्ध साळगाव पोलिसांनी 'लुक आऊट' नोटीस जारी केली आहे. संशयिताविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ गोवा पोलीस किंवा साळगाव पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी या नोटीसीद्वारे केले आहे.





गेल्या ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मुड्डोवाडा-साळगाव येथे रिचर्ड आगासियो डिमेलो (६५, रा. गिरी, बार्देश) व अभिषेक ऊर्फ सोनू गुप्ता (२५, रा. इंदोर, मध्य प्रदेश) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. संशयिताने दोघांच्या डोक्यावर कुकरने हल्ला केल्यानंतर त्यांचे गळे चिरले होते. हे कृत्य केल्यानंतर संशयित आरोपी जगन्नाथ भगत गोव्यातून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.


Double murder at Saligao, Goa police launch hunt for killers | Goa News -  The Times of India

साळगाव येथील गजबजलेल्या वस्तीतील एका भाड्याच्या खोलीत हा प्रकार घडला होता. मृत रिचर्ड यांचा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स (संगीत वाद्ये) दुरुस्तीचा व्यवसाय होता. अभिषेक हा घटनेच्या रात्रीच रिचर्ड यांच्याकडे कामाला आला होता, तर संशयित जगन्नाथ भगत हा आधीपासूनच त्यांच्याकडे कामावर होता.




संशयित अटकेत आल्यानंतरच या दुहेरी खुनामागील नेमके कारण उघड होईल. संशयित भगत गेल्या दोन महिन्यांपासून फरार असून, साळगाव तसेच गोवा पोलिसांनी त्याच्या शोधार्थ विविध राज्यांत पथके पाठवली होती. मात्र, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याने पोलिसांनी अखेर त्याच्याविरुद्ध 'लुक आऊट' नोटीस बजावली आहे.

संशयित आरोपी आढळल्यास किंवा त्याच्याविषयी माहिती असल्यास नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

कोलवाळ पोलीस निरीक्षक : ७८७५७५६०७८
साळगाव पोलीस स्थानक : ०८३२-२२७८१००
पर्वरी पोलीस उपअधीक्षक : ७८७५७५६०२९
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक : ७८७५७५६०१६

हेही वाचा