
पणजी : यशाला (Success) कोणताही शॉर्टकट अथवा गुरुकिल्ली नसते. आजच्या स्पर्धात्मक युगात (Competitive World) कोणत्याही क्षेत्रात मेहनती (Hardwork) शिवाय पर्याय नाही; असे मत अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी व्यक्त केले. शनिवारी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (जीसीसीआय) (GCCI) आयोजित अस्तुरी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड, एमएसएमइचे संचालक एम. के. मीना, सँड्रा फर्नांडिस, संजय आमोणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वर्षा म्हणाल्या की, व्यवसाय किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात करिअर करणाऱ्या महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. घरात दबाव असूनही महिला पुढे येऊन आपले करिअर करत आहेत ही चांगली बाब आहे. आजच्या महिलांसमोर व्यवसायासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याचा त्यांनी लाभ करून घ्यावा. जीसीसीआय सारख्या संघटना त्यांना मार्गदर्शन करण्यास तयार आहेत. अनेकदा मेहनती सोबत योग्य मार्गदर्शन देखील उपयुक्त ठरते. सांघिक भावनेने काम केल्यास यश नक्की प्राप्त होईल.
जीसीसीआयने या कार्यक्रमाचे आयोजन करून गोव्यातील कानाकोपऱ्यातील उद्योजक महिलांना मंच उपलब्ध करून दिला आहे. जीसीसीआय केवळ मोठ्या उद्योगांना नव्हे तर सामान्य महिलांना देखील मदत करत आहे. महिला उद्योजकांनी पैशासह माणसे देखील जोडावीत. उद्योजक झाली तरी सर्वांनी समाजाप्रती, पर्यावरणा प्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे वर्षा उसगावकर यांनी सांगितले.
३ वर्षात ८५ लाखांची मदत
एमएसएमए खात्याचे संचालक एम के मीना यांनी सांगितले की, खात्यातर्फे महिला स्वयंसहाय्यता गटांना मदत केली जाते. मागील तीन वर्षांत येथे स्टॉल घातलेल्या २७५ गटांना ८५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यंदा २६ स्वयंसहाय्यता गटांना १० लाख रुपये देण्यात येणार आहेत.