वन व कृषी खात्याने तोडगा काढावा; स्थानिकांची मागणी

वाळपई (Valpoi) : सत्तरीत (Sattari) रानडुकर (Wild boars), माकडांकडून (Monkeys) बागायतीची हानी करण्यात येत असून, त्याचा जबर फटका बागायतदारांना बसत आहे. या जंगली प्राण्यांना हटवण्यासाठी वन खाते व कृषी खात्याने एकत्र येऊन उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक बागायतदार करीत आहेत.
साट्रे, नगरगाव, सत्तरी येथील देमू गावकर यांनी सांगितले की, रानडुकरांनी आपल्या बागायतीतील सुपारीच्या झाडांची (Nut Plantation) नासधूस केली. एका रात्रीत सुमारे १०० सुपारीची झाडे नष्ट केली. त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. एवढे कष्ट करून केलेली बागायत व सुपारीच्या झाडांची नासधूस केल्याने; मोठे नुकसान सहन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या बागायतीची रानडुकर नासधूस करीत असल्याची तक्रार आपण संबंधित अधिकारिणीकडे केली होती; मात्र, काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगितले.
बागायतदारांना वन्य प्राण्यांकडून संरक्षण देऊन शेती, बागायती करण्यास प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. अशा प्रकारे बागायतीची हानी झाल्यास बागायतदार बागायती करणे सोडून देणार असल्याचे काही स्थानिकांनी सांगितले. वन्य प्राण्यांकडून बागायतीची हानी होत असल्याची सत्तरीतील अनेक बागायतदारांच्या तक्रारी आहेत. उपजिविकेवरच वन्य प्राणी घाला घालत असल्यास करायचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. रानडुकर, माकड यांच्याकडून बागायतीची हानी होणे ही नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे सत्तरी तालुक्यातील नारळाच्या उत्पादनातही गेल्या दहा वर्षांत मोठी घट झाल्यची माहिती या बागायतदारांनी दिली. रानडुकर, माकड यांना घालवून लावण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात; मात्र, हे वन्य प्राणी दाद देत नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. वन खाते व कृषी खात्याने एकत्र येऊन यावर काही तरी उपाययोजना करावी, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.