मंगेशी, मारुतीगडाची ‘या’ दिवशी जत्रा

पणजी: निसर्गसंपन्न गोवा हे केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेसाठीही जगप्रसिद्ध आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने गोमंतकीयांसाठी खऱ्या अर्थाने 'उत्सवपर्व' घेऊन आले आहेत. राज्यभरातील प्रसिद्ध देवस्थानांच्या जत्रोत्सवांची तयारी आता अंतिम टप्प्यात असून, भक्ती आणि उत्साहाचा मेळा भरण्यास सुरुवात झाली आहे. गोव्यातील जत्रोत्सव म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर ते सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जातात. काही भागात या उत्सवांना 'कालोत्सव' म्हणूनही संबोधले जाते. गावागावांतील ग्रामदेवतेच्या या वार्षिक उत्सवांत सर्व भाविक एकत्र येतात.

जानेवारी महिन्यातील उत्सवाच्या तारखा पुढील प्रमाणे
जानेवारी महिन्यात गोव्यात जत्रोत्सव, कालोत्सव आणि मंदिरांचे वर्धापनदिनांचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण व श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण या संस्थानांचे जत्रोत्सव डिसेंबरमध्येच पार पडले. सध्या या ठिकाणी देवीला केलेला नवस फेडण्यासाठी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील असंख्य भाविक येताहेत. दरम्यान काल २ जानेवारी रोजी म्हापशाच्या सुप्रसिद्ध श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. आज ३ जानेवारी रोजी बेळगाव येथील प्रसिद्ध सौंदत्तीच्या रेणुका मातेच्या यात्रेला सुरुवात झाली.

४ जानेवारी रोजी पाज-शिरोडा येथील श्री ब्रह्मदुर्गा देवीचा जत्रोत्सव, ५ रोजी पर्ये येथील श्री भूमिका देवी, वरगांव येथील श्री चामुंडेश्वरी देवी आणि गावडेवाडा मांद्रे येथील श्री सातेरी गिरोबा देवाचा जत्रोत्सव पार पडेल. ६ जानेवारी रोजी काले येथील श्री सकल देवस्थानाचा जत्रोत्सव, नादोडे-रेवोडा येथील श्री माऊली भूतनाथ देवाचा जत्रोत्सव आणि कुचेली येथील राष्ट्रोळी देवस्थानचा यात्रोत्सव पार पडेल. ६ जानेवारीला माडेल थिवी येथील श्री महागणपती भवानी शंकर बांदेश्वर ब्राह्मण महिषासुरमर्दिनी देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव पार पडणार आहे. ७ जानेवारीला खोर्ली-म्हापसा येथील घाटेश्वर देवाचा जत्रोत्सव, शिगांवच्या श्री महादेव देवस्थानाचा कालोत्सव तसेच काणकाबांध-म्हापसा येथील राष्ट्रोळी देवाचा जत्रोत्सव पार पडत आहे.

१२ जानेवारीला साळगांवच्या श्री देवी शर्वाणी देवस्थानचा वर्धापनदिन तसेच घोटेलीस्थित श्री सातेरी देवस्थानचा वार्षिक कालोत्सव पार पडेल. १३ रोजी सोनावली-कुळे येथील श्री सकलनाथ सातेरी दूधसागर देवस्थानचा वार्षिक कालोत्सव पार पडणार आहे. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. १५ जानेवरीला उगे-सांगे येथील श्री हेमांडदेवाचा कालोत्सव पार पडणार आहे. १७ जानेवारीला खांडीवाडा कुडचडे येथील श्री गजानन मंदिर वार्षिकोत्सव, कामरखंड-अमळाय, पंचवाडी स्थित श्री सोमनाथ देवस्थानच्या वार्षिकोत्सवास प्रारंभ होईल.
१९ जानेवारीला वेर्लेच्या श्री राष्ट्रोळी नारायण देवाची जत्रा पार पडेल. २० रोजी सुकुर-पर्वरी येथील श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी ब्राह्मण देवालयाची जत्रा, सांगेच्या श्री गणपती व्याघ्रेश्वर देवाचा मूर्तीप्रतिष्ठापना दिन, धावे येथे श्री हनुमान मूर्तीप्रतिष्ठापना दिन, सुलाभाट-आगशी येथील श्री सांखळ्यो देवस्थानचा वर्धापन दिन, बायणा येथील श्रीदेव खाप्रेश्वर देवाचा वर्धापन दिन साजरा होत आहे.

२१ जानेवारीला सिरसई येथील श्री महालक्ष्मी देवस्थान वर्धापनदिन साजरा होईल. २३ रोजी धाकलेभाट डोंगरी येथील श्री जगदंबा षष्ठी शांतादुर्गा पूर्वाधिष्ठान वर्धापन दिन, मारंगण-सांगेस्थित श्री सकलनाथ देवाची जत्रा, शेल्डे केपे स्थित श्री शांतादुर्गा गोठण देवस्थानची जत्रा, देवनामळ-काले येथील श्री देवदेवेश्वर देवालयाचा जत्रोत्सव पार पडणार आहे. २४ रोजी जुवारवाडा तिवरे येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचा वर्धापनदिन तसेच शेळ-बस्तोडा येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानचा वर्धापनदिन साजरा केला जाईल.

२५ रोजी श्री मंगेशी देवस्थानचा रथोत्सव आणि वन-म्हावळिंगे, डिचोलीस्थित महामाया देवीचा जत्रोत्सव पार पडेल. २७ रोजी मारुतीगड-मळा,पणजी येथील श्री मारूतीराय संस्थानाचा जत्रोत्सव आणि दांडा-शिवोलीस्थित श्री म्हाताराजेश्वर देवस्थानची जत्रा पार पडेल. २८ रोजी मुळगांव येथील श्री देवी केळबाई देवस्थानचा वर्धापनदिन साजरा होत आहे. २९ रोजी रावण-केरी येथील श्री सातेरी देवस्थानात कालोत्सव साजरा केला जाईल. ३० रोजी कुडचडे येथील श्री सातेरी मंदिराचा जत्रोत्सव साजरा करण्यात येणार असून ३१ जानेवारीला आझोशी येथील श्री महादेव देवस्थानचा वर्धापनदिन तर रावणफोंड येथील श्री शांतादुर्गा मंदिराचा वर्धापनदिन साजरा करण्यात येईल.