
मडगाव : कुडतरी येथील कार्मेल चॅपेलजवळ झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीचालक महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संशयित थार जीप चालक नेल्सन गोन्साल्वीस याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने विविध अटी घालून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने संशयिताला एक लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचा हमीदार सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ही दुर्घटना १८ डिसेंबर रोजी रात्री घडली होती. संशयित नेल्सन गोन्साल्वीस (रा. गिर्दोली) याने चालवलेल्या थार जीपची जोराची धडक बसून अॅक्टिव्हा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या इनासिया कॅटरिना सिल्वा (वय ५७, रा. माकाझाना) या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मायना-कुडतरी पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. अटकेची शक्यता लक्षात घेऊन नेल्सनने आपल्या वकिलामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.
न्यायालयाने जामीन अर्जावर निकाल देताना संशयिताला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याला गोवा राज्याबाहेर जाता येणार नाही, तसेच प्रकरणाशी संबंधित कोणत्याही साक्षीदारावर दबाव आणता येणार नाही, अशा कडक अटी न्यायालयाने घातल्या आहेत. संशयिताला ४ ते ९ जानेवारी या कालावधीत नियमितपणे पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार असून, त्यानंतरही तपासासाठी पोलिसांनी बोलावल्यास हजर राहावे लागणार आहे.
इतकेच नव्हे तर, जोपर्यंत या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल होत नाही, तोपर्यंत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी संशयिताला मायना-कुडतरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे लागेल. खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहणे अनिवार्य असून, संशयिताला आपला पासपोर्टही न्यायालयात जमा करावा लागणार आहे. या सर्व कायदेशीर अटींचे पालन करण्याच्या हमीवरच न्यायालयाने हा जामीन दिला आहे.