पुढील वर्षापासून दहावीत ४ विषयांत नापास विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीत प्रवेश

शालांत मंडळाने सर्व शाळांना पाठवले परिपत्रक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th April, 12:34 am
पुढील वर्षापासून दहावीत ४ विषयांत नापास विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीत प्रवेश

पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लागू झाल्यानंतर, पुढील वर्षापासून (२०२६ - २०२७) दहावीत ४ शैक्षणिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिला जाईल. तथापि, दहावीच्या अनुत्तीर्ण विषयांमध्ये उत्तीर्ण होईपर्यंत त्यांचा अकरावीचा निकाल जाहीर केला जाणार नाही, अशी माहिती शालांत मंडळाच्या सूत्रांकडून मिळाली.

नववीनंतर, राष्ट्रीय शिक्षण धोरण या वर्षापासून (२०२५ - २६) दहावीच्या वर्गाला लागू होईल. शालांत मंडळाने सर्व शाळांना परीक्षेचे पेपर्स आणि मूल्यांकन पद्धतीबाबत एक परिपत्रक पाठवले आहे.

दहावीसाठी ६ शैक्षणिक (स्कोलेस्टीक) आणि ४ कौशल्य (स्कील बेस्ड) विषय असतील. तीन भाषा (इंग्रजी, मराठी/कोकणी आणि एक भाषा) समाजशास्त्र, विज्ञान आणि गणित असे ६ विषय शिकवले जातील. या ६ विषयांपैकी ४ विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून एटीकेटी अंतर्गत अकरावीमध्ये प्रवेश दिला जाईल. निड्स इम्प्रूमेंट असा शेरा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉपेन्सेटरी योजना लागू होणार आहे.

विज्ञान विषयाचा पेपर ७० गुणांचा असेल तर इतर पाच शैक्षणिक विषयांचे पेपर ८० गुणांचे असतील. विज्ञान विषयात १० अंतर्गत आणि २० प्रात्यक्षिक पेपर गुण असतील. इतर पाच विषयांसाठी २० अंतर्गत गुण असतील.

आंतरविद्याशाखीय क्षेत्र, व्यावसायिक (एनएसक्यूएफ), कला आणि शारीरिक शिक्षण हे चार विषय कौशल्यावर आधारित असतील. या चारही विषयांसाठी लेखी पेपर ४० गुणांचे असतील. पेपरसाठी २ तास असतील. या चार विषयांसाठी अंतर्गत गुण ६० असतील. सर्व १० विषयांसाठी (लेखी, अंतर्गत, प्रात्यक्षिक) एकूण गुण पूर्वीसारखेच १०० असतील.

एक किंवा दोन शैक्षणिक विषयांमध्ये एच किंवा आय ग्रेड मिळाला तर त्यांची या विषयातील ग्रेड सुधारेल. तथापि, यासाठी दोन कौशल्य विषयांमध्ये किमान ६५ टक्के गुण आवश्यक आहेत. तसेच, इतर दोन कौशल्य विषयांमध्ये ५० टक्के गुण आवश्यक आहेत. या योजनेमुळे हे शक्य होईल. तसेच खेळाचे गुण मिळतील. याचा फायदा इतर दोन विषयांना होऊ शकतो. अन्यथा, विद्यार्थ्यांना दोन विषयांसाठी कॉम्पेसेटरी योजना आणि दोन विषयांसाठी एटीकेटीसह एकत्रितपणे ४ विषयांमध्ये फायदा होईल, असे शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेट्ये यांनी सांगितले.