आठ भाज्यांबाबत गोवा झाले स्वयंपूर्ण

फलोत्पादन महामंडळ : काही भाज्या होतात निर्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
आठ भाज्यांबाबत गोवा झाले स्वयंपूर्ण

समीप नार्वेकर

पणजी : यापूर्वी भाज्यांसाठी गोव्याला बेळगाववर अवलंबून राहावे लागत होते. आता परिस्थिती बदलली आहे. आता राज्यातच भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. सात प्रकारच्या भाज्यांबाबत आता गोवा स्वयंपूर्ण झाला आहे. या भाज्या आता आयात कराव्या लागत नाहीत, उलट काही भाज्या निर्यात केल्या जात आहेत. फलोत्पादन महामंडळाच्या हमी भाव योजनेमुळे भाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली, असे महामंडळाचे सरव्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.
गोव्याच्या शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन महामंडळ खात्रीशीर बाजार योजना राबवत आहे. या योजनेखाली भाजी विकण्यासाठी खात्रीशीर बाजार सुविधा आणि खात्रीशीर दर महामंडळ देते, असे देसाई यांनी सांगितले.
राज्यात काकडी, भेंडी, चिटकी, भोपळा, वांगी, हिरवी मिरची आणि कोबी या भाज्यांचे उत्पादन घेण्याबाबत गोवा स्वयंपूर्ण झाला आहे. बेळगाव येथून या भाज्यांची आयात २५ ते ३० टक्के कमी होऊन आता महामंडळाला या भाज्यांसाठी बेळगाववर अवलंबून राहावे लागत नाही. गोव्यातील शेतकरीच या भाज्यांचे उत्पादन घेत आहेत, असे देसाई यांनी सांगितले.
महामंडळ या सात भाज्या गोव्यातील शेतकऱ्यांकडून विकत घेऊन महामंडळाच्या केंद्रांना पुरवत आहे. जी भाजी राहते ती गोवा बागायतदार आणि खासगी दुकानदारांना पाठवली जाते. तरीही जर ही भाजी शिल्लक राहिली तर ती बेळगावला निर्यात केली जाते, असे देसाई म्हणाले.
या योजने अंतर्गत गेल्या सहा वर्षांची तुलना केल्यास यंदा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत १६७ पर्यंत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात यंदा ६५८ मेट्रिक टन एवढी वाढ झाली आहे. उत्पादनासाठी मिळणाऱ्या लाभात २.५२ कोटींपर्यंत वाढ झाली आहे आणि फलोत्पादन केंद्राच्या दोन केंद्रात वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षांत ही संख्याही वाढत आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांचा आढावा घेतल्यास वर्ष २०२३-२४ मध्ये १,१८७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि २०२४-२५ वर्षात १,२४८ शेतकरी लाभ घेत आहेत. वर्ष २०२३-२४ मध्ये १,५०९ मेट्रिक टन गावठी भाजी महामंडळाने खरेदी केली आणि २०२४-२५ वर्षात यात वाढ होऊन १,६२४ मेट्रिक टन भाजी महामंडळाने खरेदी केली आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये ५.९४ कोटी एवढे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आणि २०२४-२५ मध्ये यात वाढ होऊन ६.६७ कोटी एवढे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.खात्रीशीर बाजारभाव योजनेखाली वेगवेगळ्या भाज्यांसाठी एक दर निश्चित केलेला आहे. जर बाजारभावात भाज्यांचा दर निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी होत असल्यास आम्ही हा दर कमी करत नाही, आम्ही शेतकऱ्यांना वाढीव दर देतो. दर बाजारभावात ठरवलेल्या दरापेक्षा वाढला तर आम्ही दर वाढवतो. उदाहरणादाखल जर भेंडीचा दर ५० रुपये ठरवला असेल आणि बाजारात भेंडीचा दर २० रुपयांनी कमी आहे तर आम्ही ५० रुपयेच देतो. जर दर ८० रुपये होतो तर आम्ही ८० रुपयांपर्यंत वाढवतो, असे देसाई यांनी सांगितले.

बाहेरील राज्यात शेतकऱ्यांचे उत्पादन विकत घेणारे व्यापारी आणि त्यांचा दर ठरलेला नसतो. पण, शेतकऱ्यांना चिंता करण्यासारखी गोव्यात ही परिस्थिती नाही. खात्रीशीर बाजार योजनेखाली त्यांना भाजी विकण्यासाठी जागा शोधण्याची गरज नाही. त्यांनी महामंडळच्या खरेदी केंद्रांवर येऊन त्यांच्याजवळ असेल तेवढी भाजी केंद्रांवर घालावी. किती भाजी केंद्रावर द्यावी यावर कसलीच मर्यादा नाही. _चंद्रहास देसाई, महामंडळाचे सरव्यवस्थापक