सचिन खुटवळकर : कोलवाळ येथे डॉ. आंबेडकर जयंती
म्हापसा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्रिकालाबाधित आहेत. राज्यघटनेचा मसुदा पूर्ण केल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात लोकांनी आपल्या धारणा संकुचित ठेवल्या, तर भविष्यात कदाचित देश हुकूमशाहीच्या दिशेने जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली होती. ती भीती खरी ठरू नये, यासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सजग राहायला हवे, असे प्रतिपादन दै. ‘गोवन वार्ता’चे वृत्तसंपादक सचिन खुटवळकर यांनी केले.
कोलवाळ येथील डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयात आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक विठ्ठल पार्सेकर, शिक्षक भारत बागकर, अरुण बिचोलकर उपस्थित होते.
लोकशाही मूल्यांच्या आधारावर डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यघटना तयार केली. सर्व समाजघटकांना समान न्याय हे सूत्र त्यांना अपेक्षित होते. महिला, अस्पृश्य, दिव्यांग, खेड्यांतील नागरिक आदी घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी कायदे प्रस्तावित केले. आरक्षणाची तरतूद त्यासाठीच केली होती. मात्र आजची स्थिती पाहिली तर लोकशाहीचा पाया कमकुवत करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे दिसून येते. लोकांचा बुद्धिभेद करून त्यांचे लक्ष मुख्य समस्यांपासून दूर करण्यासाठी धार्मिक भावनांचे भांडवल केले जात आहे. हा कावा युवा पिढीने ओळखून सावध व्हायला हवे, असे खुटवळकर म्हणाले.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक विजय मळीक यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेली कविता दशरथ रेपाल यांनी वाचून दाखवली. चेतना घुरसळे यांनी प्रजासत्ताक शपथेचे वाचन केले. मुख्याध्यापक विठ्ठल पार्सेकर यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक भारत बागकर सूत्रसंचालन केले. मनोहर गोवेकर यांनी आभार मानले.