खाण कंपनीला सरकारकडून अटी; प्रतिज्ञापत्रही घेतले
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : खाण लिलावात शिरगावातील ब्लॉक मिळवलेल्या कंपनीसाठी लईराई मंदिराच्या सीमेपासून १५० मीटर आणि गावातील शेवटच्या घरापासून ५० मीटर अंतरापर्यंत खाण खात्याने ‘बफरझोन’ घालून दिला आहे. तसे प्रतिज्ञापत्रही खात्याने संबंधित कंपनीकडून घेतले आहे. त्यामुळे खात्याने नेमून दिलेल्या भागांमध्ये या कंपनीला कधीही खाणकाम करता येणार नाही, अशी माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी मंगळवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
खाण खात्याने काही महिन्यांपूर्वी नऊ खाण ब्लॉकचा लिलाव केला. हा लिलाव करताना संबंधित ब्लॉक असलेल्या भागातील नागरिकांची घरे, मंदिरे, वारसास्थळे आदींची पाहणी करण्यात आली नाही. शिरगावातील ब्लॉकच्या परिसरात लईराई मंदिर, तसेच नागरिकांची घरे आहेत. त्यामुळे लिलावानंतर या भागातील नागरिकांनी खाण ब्लॉकमधून लईराई मंदिर वगळण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केेली होती. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही स्थानिकांना तशी हमी दिली होती. त्यानुसार आता हा ब्लॉक ज्या कंपनीला मिळाला आहे, त्या कंपनीकडून खाण कामासाठी लईराई मंदिराच्या सीमेपासून १५० मीटर आणि गावातील शेवटच्या घरापासून ५० मीटर अंतरापर्यंत कधीही खाण काम करू नये, असे प्रतिज्ञापत्र खाण खात्याने घेतलेल्याचे सूत्रांनी सांगितले. लिलाव झालेल्या इतर आठ ब्लॉकसंदर्भातही तशाच प्रकारचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने खाण खात्याच्या अधिकाऱ्यांशी हे ब्लॉक मिळवलेल्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला खाण उद्याेग सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने पहिल्या टप्प्यात नऊ खाण ब्लॉकचा लिलाव केला; परंतु लिलावाआधी पाहणी करून तेथील नागरिकांची घरे, मंदिरे, वारसास्थळे यांचा विचार करण्यात आला नव्हता. आता लिलावानंतर या गोष्टींमुळे ब्लॉक मिळवलेल्या कंपन्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लिलावात ब्लॉक मिळवलेल्या कंपन्यांसमोरील हे प्रश्न सोडवण्यास सरकारने गती दिल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
आणखी काही ब्लॉकचा लवकरच लिलाव
पुढील काही महिन्यांत आणखी काही खाण ब्लॉकचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी खाण खात्याने संबंधित ब्लॉक परिसराचा सर्व्हे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. तेथील प्रश्न, समस्यांवर तोडगा काढूनच ब्लॉकचा लिलाव होणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.