वक्फ बैठकीला मगो, अपक्ष आमदारांची उपस्थिती
पणजी : वक्फ कायदा दुरूस्ती मुसलमानांसह सर्व धर्माच्या लोकांसाठी कशा प्रकारे हिताची आहे, याबाबत गोव्यात जनजागरण अभियान होणार आहे. या अभियानात मगोसह अपक्ष आमदारही सहभागी होणार आहेत. या दुरूस्तीचा लाभ दहा वर्षांनंतर दिसू लागेल, असे वीजमंत्री व मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यानी बैठकीनंतर सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार डॉ. राधामोहनदास अगरवाल यांनी आज आमदार व भाजप पदाधिकाऱ्यांना वक्फ कायदा दुरूस्तीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर यांच्यासह मगोचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जीत आरोलकर उपस्थित होते. अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व अलेक्स रजिनाल्ड सुद्धा बैठकीला उपस्थित होते.
वक्फच्या मालमत्तेत २००६नंतर सहा पटीने वाढ झाली आहे. ही वाढ कशी झाली, ते थोड्या वर्षांनी जनतेला कळणार आहे. वक्फ कायदा दुरूस्ती विधेयकामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यानी जुलुमशाही बंद केली आहे.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन. बैठकीत डॉ. राधामोहनदास अगरवाल यानी योग्यप्रकारे मार्गदर्शन केले आहे. कायदादुरूस्तीचे लाभ आम्ही लोकांपर्यंत पोहचवू, असे वीजमंत्री व मगोचे आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले.
मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा नाही : मॉविन गुदिन्हो
बैठक वक्फ दुरूस्ती कायद्याबाबत होती. यात मंत्रिमंडळाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. वक्फने ज्या मालमत्ता हडप केल्या आहेत, त्या ताब्यात घेऊन त्यांचा योग्य प्रकारे विनियोग केला जाईल. दुरूस्ती विधेयक, त्यातील तरतुदी व लाभ याबाबत जागृती केली जाईल. वक्फने ताब्यात घेतलेल्या मालमत्तांचा मुस्लिम समाजालाच फटका बसलेला आहे, असे पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले.
कुठल्याही कार्यालयात प्रवेश करण्याबाबत बंधने नाहीत : आलेक्स रेजिनाल्ड
मी अपक्ष आमदार आहे. सरकारला माझा पाठिंबा असल्याने मला वक्फ कायदा दुरूस्तीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यानुसार भाजप कार्यालयात मी बैठकी निमित्त उपस्थिती लावली. अपक्ष असलो तरी कोणत्याही कार्यालयात प्रवेश करण्याबाबत मला बंधने नाहीत, असे आलेक्स रेजिनाल्ड यांनी बैठकीनंतर सांगितले.