नमुने पाठवलेल्या प्रयोगशाळेकडून अहवालाची प्रतीक्षा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बोंडला प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राण्यांना विलगीकरणात ठेवले आहे. सर्व प्राण्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे प्रयोगशाळेकडून या आठवड्यात नकारात्मक अहवाल प्राप्त होताच बोंडला प्राणीसंग्रहालय स्थानिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती तेथील सूत्रांनी मंगळवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
बोंडला प्राणीसंग्रहालयातील तीन उदमांजरे (सीवेट कॅट) आणि दोन रानमांजरांचा (वाईल्ड कॅट) ‘एच५एन१’ या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे प्राणीसंग्रहालय जनतेसाठी बंद ठेवण्यात आले होते. शिवाय सर्वच प्राण्यांना विलगीकरणात ठेवले होते. सध्या सर्वच प्राण्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. तेथून या आठवड्यात नकारात्मक अहवाल प्राप्त होताच प्राणीसंग्रहालय स्थानिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.